Advertisement

टेंडर न काढताच उभारले जम्बो कोविड सेंटर, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर आरोप

जम्बो कोविड सेंटर, बाॅडी बॅग, आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी टेंडर न काढताच महापालिका आणि राज्य सरकारकडून कामे दिली जात आहेत, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

टेंडर न काढताच उभारले जम्बो कोविड सेंटर, नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर आरोप
SHARES

एका बाजूला मुंबई महापालिकेचे आयुक्त जुलैमध्ये मुंबईतील मृत्यूदर कमी होईल, कोरोनाला आपण हरवू असं आश्वासन देतात, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या नावाखाली मुंबईला लुटण्याचं काम सुरू आहे. जम्बो कोविड सेंटर, बाॅडी बॅग, आॅक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी टेंडर न काढताच महापालिका आणि राज्य सरकारकडून कामे दिली जात आहेत. ही कुणाच्या मित्रमंडळींना खूश करण्यासाठी दिली जात आहेत? असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून साधलेल्या संवादात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, मुंबईत कोरोनाची स्थिती इतकी भयंकर आहे की रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत, हेल्पलाईनवर कॉल केल्यावर बेड्सची स्थिती सांगितली जात नाही. तर दुसऱ्या बाजूला नेस्को, बीकेसी इथं हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचं टेंडर न देता ही कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. बरं वेळ जाऊ नये म्हणून टेंडर काढली नसतील, पण त्याठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी काय सुविधा आहेत? तिथं फक्त बेड्स आहेत, डॉक्टर, नर्स, वैद्यकीय उपकरणांचं काय?  बीकेसीतील १ हजार खाटांच्या कोविड सेंटरमध्ये फक्त १५० रुग्ण आहेत. ते पूर्णपणे भरलेले नसताना फेज १, फेज २ उभारली जात आहेत. प्रत्येक कोविड सेंटरमागे २७ कोटी रुपये खर्च होतो. हा खर्च कोणासाठी केला जातोय?

हेही वाचा - आधी कोरोनाकडे लक्ष द्या, मगच…, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

ऑक्सिजन नसल्याने २२० लोकांचे प्राण गेले आहेत. आॅक्सिजन सिलिंडर पुरवण्याचं काम टेंडर न काढताच एका बिल्डरला देण्यात आलंय. आता बिल्डर घरं बांधणार की लोकांना ऑक्सिजन सिलेंडर देणार? याचप्रकारे पेग्विन आणले होते, तेव्हा त्यांना सांभाळण्याचं काम आदित्य ठाकरेंच्या मित्राला देण्यात आलं, कोणताही अनुभव नसताना काम त्यांना मिळालं. इतकी वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता आहे, मुंबईत ९०० ते ९५० रुपयांमध्ये बॉडी बॅग पुरवणारा विक्रेता असताना ६ ते साडेसह हजार रुपये देऊन बाॅडी बॅग विकत घेतली जात आहेत. त्यातलं २०-२० टक्के कमिशन खाल्ल जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.

ज्या मित्रपरिवारांच्या सांगण्यावरुन तुम्ही हे करताय, ही सगळी माहिती जेव्हा समोर येईल तेव्हा मुंबईच्या रस्त्यावरुन फिरणं कठीण होईल. त्यामुळे मुंबई सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या अन् चालते व्हा, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा - महापालिका रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी नेमके बेड किती?- नितेश राणे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा