मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेमधील रहिवाशांसाठी एसआरए योजना राबविणार आणि जोगेश्वरी येथील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीमधील रहिवाशांना माहूल येथे कायमस्वरूपी घर देण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यासंदर्भात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दावा केला की, भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे प्रकरण मार्गी लावले. याबाबत त्यांनी पत्रकारांना अधिकृतपणे माहितीही दिली.
त्यानंतर गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या कार्यालयाकडून प्रेस नोट पाठविण्यात आली. या प्रेसनोटमध्ये दावा करण्यात आला की, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या विनंतीमुळे जोगेश्वरी विधानसभेच्या विविध समस्यांवर बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत जोगेश्वरीतील रेल्वे जमिनीवर असलेल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यात आली होती. ज्यांच्या झोपड्या तोडण्यात आल्या अशांना माहुल येथे तात्पुरत्या स्वरूपात घरे देण्यात आली तर आरेमधील झोपडपटृीधारकांसाठी एसआरए योजना राबविण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. आदिवासी तसेच बिगर आदिवासी यांच्या पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत. तर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय विभागाकडून प्रेसनोटही काढण्यात आली आहे.