• मैदानावरून 'दांडिया'
SHARE

दादर - पर्युषण पर्वानंतर मनसेने आता रास, दांडियाला स्वस्तात मिळणाऱ्या मैदानाविरोधात मोर्चा उघडला आहे. रास,दांडिया आयोजकांना पालिकेने मैदाने नाममात्र दराने न देता व्यावसायिक दराने किंवा नफ्यात 50 टक्के नफा हिस्सेदारीच्या तत्त्वावर द्यावीत, अशी मागणी मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

येत्या 1 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. त्याकाळात आयोजित होणाऱ्या रास, दांडियासाठी पालिकेकडून अल्पदरात मैदाने उपलब्ध केली जातात. पण दांडियाचे आयोजक नंतर दांडियाची तिकिटे हजारो रुपयांना विकून लाखो रुपयांची उलाढाल करतात. त्यामुळे त्यांना सवलतीच्या दरात मैदाने देण्यास मनसेने आक्षेप घेतला आहे.

"गणेशोत्सव काळात जी गणेशोत्सव मंडळे प्रायोजकांकडून बॅनर किंवा गेट घेतात, त्यांच्याकडून व्यावसायिक दराने भाडे वसूल केले जाते. मग दांडिया आयोजकांना वेगळा न्याय का?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

दांडियामधून होणारी आर्थिक उलाढाल पाहता, नवरात्रीच्या काळात दांडियाच्य़ा आयोजकांकडून पालिकेने व्यावसायिक दराने किंवा 50 टक्के नफा हिस्सेदारीच्या तत्त्वावर मैदाने द्यावीत, असा प्रस्ताव देशपांडे यांनी ठेवला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या