Advertisement

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकूण घेणारी व्यवस्थाच नाही, शेतकरी आत्महत्येवरून फडणवीसांचं टीकास्त्र

मंत्रालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आता तरी त्यांचा प्रश्न सोडविला पाहिजे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं.

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकूण घेणारी व्यवस्थाच नाही, शेतकरी आत्महत्येवरून फडणवीसांचं टीकास्त्र
SHARES

शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकूण घेणारी व्यवस्थाच नाही. मंत्रालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आता तरी त्यांचा प्रश्न सोडविला पाहिजे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मंत्रालयासमोर विष पिऊन एक शेतकरी आत्महत्या करतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. एक तर सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकूण घेणारी कुठली व्यवस्थाच उरलेली नाही. जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावरही नाही. ज्या प्रकारे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होताहेत, आपापले हितसंबंध वापरून बदली घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांकडे गरीबांकडे पाहण्यास फुरसत नाही. 

तर दुसरीकडे मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री असतील वा सरकार असेल, यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे दिलासा देण्याचा निर्णय घेताना हे सरकार दिसत नाही. एका बाजूला मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढत असताना या घटनेकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. एकतर त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा- यंदाही मानाच्या हंड्या फुटणार नाहीत; राज्य सरकारनं नाकारली परवानगी

दरम्यान, जमिनीच्या वादातून सुभाष जाधव (५४) नावाच्या व्यक्तीने शुक्रवार २० आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. तब्येत खालावल्यानंतर जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवासी आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून गावातील शिंदे कुटुंबासोबत त्यांचा शेतजमिनीवरून वाद सुरू होता. सातत्याने झगडा भांडण आणि मारामारीतून मंचर पोलिसांत शिंदे यांच्यावर ३ तर जाधव यांच्यावर २ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

या जमिनीच्या वादातूनच न्याय मिळवण्यासाठी सुभाष जाधव २० आॅगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचले. मात्र  मंत्रालयात त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने जाधव यांनी रागाने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेऊन तातडीने नजीकच्या जीटी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारांदरम्यान परिस्थिती खाल्यावल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा