Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
SHARES

महाराष्ट्राच्या राजकारणाला शनिवारी नाट्यमय  कलाटणी मिळाली आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला.

राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गट भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या बळावर सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना ही शपथ दिली. त्यामुळे गेल्या सुमारे १५ दिवसांपासून राज्यात लागू असलेली महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट अखेर मागे घेण्यात आली आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा