Advertisement

भाजपने लोकल ट्रेन सुरू झाल्याचं श्रेय घेऊ नये, राष्ट्रवादीचा टोला

राज्य सरकार टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असून भाजपने अशी श्रेयवादाची लढाई करू नये, असा टोला राष्ट्रवादीने हाणला आहे.

भाजपने लोकल ट्रेन सुरू झाल्याचं श्रेय घेऊ नये, राष्ट्रवादीचा टोला
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १५ आॅगस्टपासून सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची घोषणा केली आहे. त्यावर भाजपने केलेल्या आंदोलनामुळेच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, असं भाजप नेते म्हणत आहे. मात्र राज्य सरकार टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असून भाजपने अशी श्रेयवादाची लढाई करू नये, असा टोला राष्ट्रवादीने हाणला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, सामान्य जनतेला रेल्वे प्रवासाला परवानगी मिळावी यादृष्टीने मुख्यमंत्री व सरकार टप्प्याटप्प्याने काम करत आहे. यामध्ये भाजपने श्रेयवाटपाची लढाई करू नये. तसंच रेल्वे प्रवासासाठी जे शक्य आहे व कोरोना संक्रमण टाळण्यासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टींचं भान राखून महाविकास आघाडी सरकार काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोविड लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासाठी महाराष्ट्र भाजपने केलेल्या आंदोलनाला यश आलं आहे. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासास अनुमती देण्याचा निर्णय स्वागतार्ह असून, जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून भाजपने केलेल्या आंदोलनाचं हे यश आहे! देर आए दुरूस्त आए, असं मुख्यमंत्र्यांसाठी म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नोंदवली होती.

हेही वाचा- रेल्वे काय भाजपची नोकर आहे का?, संजय राऊत रावसाहेब दानवेंवर संतापले

तर, भाजपाच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली. १५ ऑगस्टपासून रेल्वेबंदी उठवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. या घोषणेचा फज्जा उडणार नाही याची काळजी घ्या. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर बाकी घोषणा होणार. उद्या पहिला श्रावणी सोमवार. किमान मंदिरे उघडण्याची घोषणा तरी करायला हवी होती, असं मत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलं. 

‘मुंबई लोकल’ची सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना केली. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना ही मुभा मिळणार आहे.

लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासासाठी आवश्यक क्यू आर कोड मिळतील. राज्य सरकारने त्यासाठी विशेष अॅप तयार केला आहे. ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन नसेल, त्यांना महापालिकेच्या विभागीय कार्यालयात हे क्यू आर कोड आॅफलाइन पद्धतीने मिळतील. त्यासाठी अ‍ॅपवर किंवा कार्यालयात लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. हे क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शकेल.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा