SHARE

मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर गुटखा,पान-मसाल्याची विक्री होत असल्याचा गौप्यस्फोट 'मुंबई लाइव्ह'च्या टीमने स्टिंग ऑपरेशनमधून केला होता. त्याची दखल आता अन्न व औषध प्रशासनाने घेतली असून, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालय परिसरातील एकूण 12 ठिकाणी बसलेल्या पान विक्रेत्यांवर धाडी टाकल्या. त्यातील मंत्रालयाजवळ बसणाऱ्या एका पान विक्रेत्याकडून विमल पान मसाला, रंजनीगंधा, मिराज गुटखा, सागर गुटखा मोठ्या प्रमाणात हस्तगत केले आहेत. या गुटखा विक्रेत्यावर फूड सेफ्टी स्टॅंडर्ड अॅक्ट 2006 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी केलेल्या कारवाईत एक असिस्टंट कमिशनर आणि 5 फूड ऑफिसर्सच्या एफएसओ टीमने सहभाग घेतला.


'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून बातमी मिळाली होती की, अशा प्रकारची गुटखा विक्री मंत्रालयाच्या आसपास करण्यात येत आहे. त्यामुळे असिस्टंट कमिशनरच्या नेतृत्वाखाली पथक बनविण्यात आले होते आणि बुधवारी 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यातील एकाकडे गुटखा आणि पानमसाला सापडला आहे - सुरेश अन्नपुरे, एफडीआय सहआयुक्त (अन्न)

'मुंबई लाइव्ह'ने दाखवलेल्या बातमीनंतर अन्न आणि औषध पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी 'मुंबई लाइव्ह'ला आश्वासन दिले होते की, विशेष पथक (फ्लाईंग स्क्वॉड) पाठवून कारवाई करण्यात येईल आणि संबधित पान विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील. 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीमुळे गिरीष बापट यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. 'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यामुळे अखेर मंत्रालय परिसरात होणारी गुटखा विक्री बंद झाली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या