SHARE

राज्यातील आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. २०१६ मध्ये राज्यात ७ हजार ४९ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. तर २०१७ मध्ये त्यात १२ टक्क्यांनी वाढ होऊन गुन्हे दाखल होण्याची संख्या ७ हजार ९१६ इतकी झाली आहे.


साखळी पद्धतीने मार्केटिंग

राज्यात साखळी पद्धतीने मार्केटिंग करून लोकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या 'क्यू व्हीआयपी क्लब' कंपनीच्या देशभरातील ५७५ शाखा बंद करण्यात आल्या असून या आस्थापनाच्या ५५ खात्यांमधील आतापर्यंत १४४ कोटी रुपये हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार प्रकाश गजभिये यांनी मांडलेल्या 'क्यू व्हीआयपी क्लब' या आस्थापनाने केलेल्या आर्थिक फसवणुकीविषयी शासनाने कोणती कारवाई केली?, याविषयी मांडलेल्या लक्षवेधीवर त्यांनी वरील माहिती दिली.


कारवाईला स्थगिती

याविषयी अधिक माहिती देताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, 'क्यू व्हीआयपी क्लब'ने केलेल्या आर्थिक फवसणुकीप्रकरणी आतापर्यंत ३१ जणांनी फिर्याद नोंदवली आहेत. या आस्थापनाची सर्व संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. या प्रकरणी आरोपी न्यायालयात गेले असून सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कारवाईला स्थगिती दिली आहे.

अल्प कालावधीत अधिक मोबदला देण्याचं आमिष दाखवून ठराविक लोकांना लक्ष्य केलं जातं. यामध्ये प्रारंभी लोकांना मोठ्या प्रमाणात परताव्याची रक्कम देऊन अधिक लोकांना या जाळ्यात ओढण्यात येतं. अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत, यासाठी शासनाने परिपत्रक काढले असून अशा जाहिराती करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येईल, असं रणजीत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या