Advertisement

‘हाफकिन’ने लस संशोधनाला प्राधान्य द्यावं- उद्धव ठाकरे

हाफकिनने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर संशोधनाला प्राधान्य द्यावं, त्यासाठी आवश्यक असणारं सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

‘हाफकिन’ने लस संशोधनाला प्राधान्य द्यावं- उद्धव ठाकरे
SHARES

हाफकिन इन्स्टिट्यूटचं मुख्य काम हे विविध आजारांवरील लस निर्मिती आणि संशोधन करणं हेच आहे. त्यामुळे हाफकिनने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर संशोधनाला प्राधान्य द्यावं, त्यासाठी आवश्यक असणारं सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील–यड्रावकर, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक सीमा व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्यदायी उत्पादनाची निर्मिती व पुरवठा करणे यावर भर देताना येणाऱ्या काळात  हाफकिन इन्स्टिट्यूटने औषध निर्माणाबरोबरच कोविडसाठीची लस निर्मिती करण्याबरोबरच संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी आयसीएमआर आणि भारत बायोटेक कडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठीही प्रयत्न करण्यात यावा. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेत अद्ययावत व्हॅसिन रिसर्च सेंटर स्थापन करण्यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य असेल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईत कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी ५७४ दिवसांवर

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने हाफकिन इन्स्टिट्यूटमार्फत येत्या ५ वर्षात ५ प्रकल्पांसाठी १,१०० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं नमूद केलं आहे. हे ५ महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा पूर्ण पाठिंबा असून येत्या १५ दिवसात याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यामध्ये नेमका कोणता प्रकल्प प्रथम हाती घेतला जाऊन त्याची आवश्यकता, कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे, याचा संपूर्ण तपशील असावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

भारताला पोलिओ मुक्त करण्यात मोठा वाटा देणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने गेल्या ६ महिन्यात जवळपास २८ कोटींहून अधिक लसीची निर्मिती केली. ही बाब अभिनंदनीय नक्कीच आहे. मात्र राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील (covid19) लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणं आवश्यक आहे आणि लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरेल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

हाफकिन इन्स्टिट्यूटला निधी मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाईल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

(haffkine institute must research on covid 19 vaccine says maharashtra cm uddhav thackeray)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा