उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर विरोधकांसह पाटीदार नेते हार्दिक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि कन्हैय्या कुमार यांनी टीकेटी झोड उठवली आहे. हार्दिक पटेल यांनी मंदिर महत्त्वाचं की शेतकऱ्यांची आत्महत्या? असा सवाल केला तर, मंदिर बांधण्याएेवजी रुग्णालय, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.
रविवारी मुंबईत वेगवेगळ्या 17 संघटना आणि विरोधकांकडून संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, जिग्नेश मेवाणी, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, कन्हैय्या कुमार, हार्दिक पटेलसह अनेक जण सहभागी झाले होते.
राज्यभरात शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा घेऊन अयोध्या दौरा करत आहेत. अयोध्येत १४४ कलम लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आले कसे? जेव्हा आम्ही आंदोलन करतो तेव्हा तातडीने सुरक्षा ठेवण्यात येते', अशा शब्दात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर हार्दिक पटेल यांनी टीका केली.
कन्हैया कुमार यानं देखील उद्धव टाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. 'मंदिर बांधले का असा प्रश्न विचारू नका, तर रग्णालय आणि शाळा बांधल्या का? असा सवाल सरकारला विचारा. अयोध्या हा अस्थेचा विषय आहे, त्यामुळे त्यावर राजकारण नको. मंदिर हा प्रश्न नाही तर देशात जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर दुर्लक्ष केलं जात आहे’, अशा शब्दात कन्हैया कुमारने टीका केली आहे.
कारण नसताना देखील वातावरण तापवले जातं आहे. धर्म संकटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. परंतु, संविधान संकटात आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआय या संस्था संकटात आहेत. संघाला लोकशाही संपवायची आहे म्हणून हे सगळ सुरू आहे, असं कन्हैया कुमार म्हणाला.