Advertisement

जर मॅचच फिक्स असेल, तर खेळून काय फायदा?, असं का म्हणाले राज ठाकरे?

उद्या कोणी हे म्हणायला नको की बॅलेट पेपरची मागणी करणार राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे का गेले नाहीत? यासाठी एक औपचारिकता म्हणून आम्ही त्यांची भेट घेऊन हे पत्र दिलं आहे.

जर मॅचच फिक्स असेल, तर खेळून काय फायदा?, असं का म्हणाले राज ठाकरे?
SHARES

गेल्या ३० वर्षांपासून लोकं ईव्हीएमवर संशय घेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास मतदान प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल. या मागणीसाठी मी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. परंतु त्यांच्या प्रतिक्रियेवरून आमच्या मागणीचा विचार होईल, असं वाटत नाही. कारण जर मॅचच फिक्स असेल, तर खेळून काय फायदा? असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या प्रश्नावर निवडणूक आयोग आणि भाजपाला धारेवर धरलं.   

सन २००५ नंतर तब्बल १४ वर्षांनी राज ठाकरे दिल्लीत आले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचा तपशील सांगितला.

पारदर्शकता हवी

मतदारांना आपण कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. मी याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीदरम्यान ३७० मतदारसंघांमध्ये घोळ झाल्याची शंका आहे. जे निवडून आलेत, त्यांना देखील शंका आहे. मतदारांनी जेवढं मतदान केलं आहे, त्यापेक्षा जास्त मतदान नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे बॅलेट पेपरची पद्धत पुन्हा आणली पाहिजे. अशी मागणी आम्ही त्यांना पत्र देऊन केली आहे.

औपचारिकता म्हणून भेट

परंतु त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे हावभाव होते, त्यावरूनच त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही, असंही लक्षात येत होतं. त्यामुळे निवडणूक आयोग आमचं ऐकेल, आमच्या मागणीचा विचार होईल, असं मला जराही वाटत नाही. म्हणूनच मला त्यांच्याकडून शून्य अपेक्षा आहेत. उद्या कोणी हे म्हणायला नको की बॅलेट पेपरची मागणी करणारे राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे का गेले नाहीत? यासाठी एक औपचारिकता म्हणून आम्ही त्यांची भेट घेऊन हे पत्र दिलं आहे.

चीप अमेरिकेतून

तसंच ईव्हीएममध्ये लावण्यात येणारी चीप कुठून येते? असं विचारल्यावर ही चीप अमेरिकेतून येत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे जर मॅचच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

भाजप का गप्प?

२०१४ आधी भाजपने ईव्हीएम मशीन विरोधात रान उठवलं होतं. त्यासाठी कोर्टातही गेले होते. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप गप्प का? असं विचारताना ज्या देशात २ महिने निवडणुका चालतात, तिथे २ दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? असा सवालही राज यांनी केला. 



हेही वाचा-

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजीला पुन्हा उधाण, ‘हे’ काँग्रेसचे नेतेच करताहेत एकमेकांवर चिखलफेक

मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा