Advertisement

ही फ्रेंडली मॅच नाही - उद्धव ठाकरे


SHARES

मुंबई - आजपासून लोकशाहीच्या लढाईला सुरुवात झालेली आहे. युती तुटली. पण यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात ही फ्रेंडली मॅच आहे आणि इकडचे त्यांचे टिंगू पिंगू महाभारत सांगताहेत. पण मी आता अमित शाह यांना सांगतो की, तुम्ही तुमच्या संकटकाळी तुमच्या पाठीशी उभा राहणारा मित्र गमावलेला आहात. आता ही फ्रेंडली मॅच नाही आहे तर ही आमच्या अस्मितेची लढाई आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा समाचार घेतला.
गिरगाव येथील चिरा बाजार, ठाकूरद्वार परिसरात शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. 'निश्चय विजयाचा' या प्रचार शुभारंभाच्या पहिल्या सभेत बोलताना, उद्धव ठाकरे यांनी आम्ही जी कामे केली आणि जी करणार आहोत, तीच आम्ही होर्डिंगद्वारे सांगितली आहेत. तुमच्यात जर हिम्मत असेल तर केलेल्या कामावर बोला आणि आमचे दावे खोडून दाखवा, मी तुम्हाला आव्हान देतो, अशा शब्दात त्यांनी भाजपसह विरोधकांना आव्हान दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना धन्यवाद देत उद्धव ठाकरे म्हणाले,तुम्ही आमच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवलीत, कारण जो शिवसेनेला विरोध करतो तो यापुढे राजकारणात दिसत नाही. ज्यांनी शिवसेनेला विरोध केला तो संपला आहे, हा इतिहास आहे. भाजपाच्या पारदर्शकतेचा बुरखा केंद्रातल्या आर्थिक पाहणी अहवालाने टरा टरा फाडला. त्यांचेच दात त्यांच्या घशात कोंबले. आता या पारदर्शक अहवालामुळे यांचीच बोबडी वळली. आधीच बोबडे त्यात बोबडी वळली, अशा शब्दात त्यांनी भाजपा नेत्यांची खिल्ली उडवली

काँग्रेसचीही उडवली खिल्ली 
काँग्रेसच्या होर्डिंग्जवर खड्डे, जिथे जायचंय तिथे त्यांना तेच दिसते. त्यांना खड्ड्यातचं जायचंय. अख्खा देश यांनी खड्ड्यात घातला आता देशवासीयांनी यांना खड्ड्यात घातलं अशी खिल्ली त्यांनी उडवली.

परिवर्तनाची एवढी घाई कशाला
मुख्यमंत्री म्हणाले परिवर्तन होणारच. अहो पण एवढी घाई कसली परिवर्तनाची, अजून दोन वर्षे बाकी आहेत की! एवढीच परिवर्तनाची घाई असेल तर घेऊन टाका पुन्हा सर्व निवडणुका, आम्ही तयार आहोत, असेही आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

श्रीपाल सबनीस यांचे अभिनंदन
कल्याण डोंबिवली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे जाहीर अभिनंदन उद्धव ठाकरे यांनी केले. याचवेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राला मतदान करणार की महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्यांना, असा सवालही मुंबईकरांना केला.

चप्पल न घालण्याचा निर्धार
यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी निवडणूक होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा