Advertisement

प्रजासत्ताक दिनी होणार ‘जेल पर्यटना’ला सुरूवात

प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा कारागृहात जेल पर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी होणार ‘जेल पर्यटना’ला सुरूवात
SHARES

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहविभागाद्वारे ‘जेल पर्यटन ही संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यानुसार येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा कारागृहात जेल पर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.  

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्य स्थान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात तसंच इतर कारागृहांतही जसं की ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी इथं कैद करुन ठेवलं होतं. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरु, पंडीत जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांना ब्रिटीशांनी येरवडा कारागृहात कैद करुन ठेवलं होतं. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत व ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या थोर नेत्यांनी केलेल्या त्यागाचं स्मरण देत राहतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुणे करार येरवडा कारागृहातील गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुद्धा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. इ.स. १८९९ मध्ये चाफेकर बंधूंना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली. तसंच जनरल वैद्य यांच्या हत्येप्रकरणी कुप्रसिद्धा जिंदा व सुखा यांनासुद्धा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली आहे. २६.११.२००८ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील कुप्रसिद्ध अतिरेकी अजमल कसाबलासुद्धा याच कारागृहात फाशी देण्यात आली.

शाळा/कॉलेज/विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थाना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टीकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमतःच ‘जेल पर्यटन’ सुरु करीत आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील. या ठिकाणी उल्लेख करणे प्रसंगोचित आहे की, कारागृहे ही समाजातील लोकांच्या प्रवेशासाठी मनाई असलेला भाग आहे.

हेही वाचा- राज्यात पोलिसांसाठी १ लाख घरे बांधणार- अनिल देशमुख

पुरेशी दक्षता

हा पर्यटन उपक्रम राबविताना सुरक्षेचं उल्लंघन होणार नाही, तसंच अनिष्ट घटकांना प्रवेश मिळणार नाही याची कारागृह प्रशासन योग्य ती काळजी घेईल. तसेच कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षता घेतली जाईल. पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याच्या पर्यटकांची संख्या ५० पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मूलभूत तपशील याचा उल्लेख करणं आवश्यक राहील, असं अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी स्पष्ट केलं.

सदरील अर्ज अधीक्षक येरवडा कारागृह यांच्या yerwadacpmh@gov.in किंवा spycppune@gmail.com या मेलवर अथवा प्रत्यक्षपणे कारागृह इथं किमान ७ दिवस अगोदर करावा. येरवडा कारागृहाचा संपर्क क्र.०२०-२६६८२६६३/०२०-२९७०२५८६ आहे. संपर्कासंदर्भात काही मुद्दा असल्यास भेट देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्र. ९८२३०५५१७७ यावर संपर्क साधावा. पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींनी आधार कार्ड, संस्थेचं ओळखपत्र किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही दस्तऐवज सादर करुन ओळख सिद्ध करणं अपेक्षित आहे. 

कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, बॅगेज, मोबाईल फोन, कॅमेरा, पाण्याची बाटली किंवा कोणतीही वस्तू कारागृहाच्या आतमध्ये नेता येणार नाही, याची नोंद घ्यावी. कारागृह प्रशासनाने फोटोग्राफी तसंच व्हिडिओग्राफीची व्यवस्था केलेली असून ते कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पुरविण्यात येईल. कारागृह विभागाला अनिष्ट व्यक्तीस प्रवेश नाकारण्याचा अधिकार असेल. तसंच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

(jail tourism will start in maharashtra on 26th january 2021)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा