भाजपा व्होट बँकेवर शिवसेनेचा डोळा

  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईतल्या गुजराती समाजानं नेहमीच भाजपाला निवडणुकीत साथ दिल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये गुजराती समाजाची भरभरून मतं भाजपाच्या पारड्यात पडली. आता याच मतांवर शिवसेनेचा डोळा आहे. निमित्त आहे मुंबई महानगर पालिका निवडणुकीचं. नोटबंदी आणि त्यातच जागोजागी पडलेल्या छाप्यांमुळे गुजराती समाज भाजपावर नाराज आहे आणि हीच संधी साधत शिवसेनेनं गुजराती चेहरा म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादीच्या हेमराज शहा यांना आपल्याकडे खेचलंय.

  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या अतिशय जवळ असलेले आणि तरीही अडगळीत पडलेले हेमराज शाह यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. त्यातच भाजपाला शह देण्यासाठी शरद पवार यांनीच शिवसेनेला पुरवलेली ही पॉवर आहे की काय अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय. मात्र गुजराती समाजाचं भलं करण्यासाठी शिवसेना योग्य असल्याचं सांगत हेमराज शहा यांनी शिवबंधन बांधून घेतल्याचं म्हटलंय.

  मुंबई महानगरपालिकेत भाजपा-शिवसेना युती होईल की नाही हे जरी आत्ताच सांगता येत नसलं तरी, युती झाली नाहीच तर भाजपाला कात्रजचा घाट दाखवण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखतेय हे मात्र नक्की.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.