Advertisement

भिवंडीकर पुन्हा ठेवतील का कपिल पाटील यांच्यावर विश्वास?


भिवंडीकर पुन्हा ठेवतील का कपिल पाटील यांच्यावर विश्वास?
SHARES

भिवंडी हा मतदारसंघ व्यापारी केंद्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापड कारखानेही आहेत. भिवंडीतला बहुतांश रोजगार हा कापड उद्योगावर आधारीत आहे. विद्यमान खासदार कपिल पाटील यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करून भिवंडी लोकसभेची जागा आपल्याकडे खेचून आणली. मोदी आणि सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे कपिल पाटील यांना मतदारांनी कौल दिला. परंतु मागच्या ५ वर्षांत परिस्थिती फारशी न बदलल्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.


राष्ट्रवादीतून भाजपाकडे

कपिल पाटील मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना भाजपात आणून भिवंडी मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. कपिल पाटील यांनी लाखभर मताने विजय खेचून आणला. मात्र, मोदी लाट असतानाही कपिल पाटील यांना केवळ ४ लाखांच्या घरात मते मिळाली. तर, काँग्रेस सरकारविरोधात वातावरण असूनही काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी ३ लाखांहून अधिक मते घेतली होती.


म्हणून भाजपात

गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील भूषवलं आहे. मात्र, आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या पारड्यात गेली. त्यानंतर कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे यांचा हात धरून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


मुस्लिम मतदार अधिक

भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ६५ टक्के मुस्लिम समाजातील मतदार आहेत. ४ ते ५ लाखांच्या घरात त्यांची संख्या असून या ठिकाणच्या निकालावर त्यांचा मोठा प्रभाव पडतो. परंतु मोदी लाटेत या ठिकाणी भाजपाला कौल दिला. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा या ठिकाणी प्रभाव आहे. १९६२ साली तयार झालेला हा मतदारसंघ १९७६ साली बरखास्त करण्यात आला होता. मात्र, २००९ मध्ये पुन्हा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांनी भाजपाच्या शिवराम पाटील यांचा पराभव केला होता.


काँग्रेसला डोकेदुखी

भिवंडी महापालिकेत मतदारांनी काँग्रेसला एकहाती सत्ता दिली होती. तर शिवसेना भाजप वाद विकोपाला गेला असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने कपिल पाटील आणि आ. किसन कथोरे यांना धूळ चारली होती. तर दुसरीकडे त्यांच्या एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीमुळे ते सर्व पक्षीयांनाच नकोसे झाल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे युतीपूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने प्रचार केला होता.


जोरदार टक्कर

भिवंडी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यातच शिवसेनेचीही पक्ष बांधणी या ठिकाणी उत्तम आहे. काँग्रेसनं या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केल्यांमुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपामध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यातच युती झाली असली तरी काही स्थानिक नेत्यांनी कपिल पाटील यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे.


सुविधांची कमतरता

या ठिकाणी अद्यापही सार्वजनिक वाहतुकीची कमतरता आहे. त्यातच रस्ते अरूंद आणि त्यावर उभारलेले उड्डाणपूल यामुळे वाहतूककोंडीही मोठ्या प्रमाणात होते. त्यातच वीजेचाही प्रश्न मोठा असून उद्घाटन झालेल्या मेट्रोचंही काम अद्याप सुरू झालेलं नाही.


#MLviews

गोपिनाथ मुंडे यांचा हात धरून भाजपमध्ये आलेल्या कपिल पाटील यांनी भिवंडीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. परंतु २०१४ सारखी आता परिस्थिती नाही. मोदी लाटेतही त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्यातच मतदारही कपिल पाटील यांच्या कामावर नाखुश असल्यामुळं त्यांना या निवडणुकीत जोर लावावा लागणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा