Advertisement

काँग्रेस शिवसेनेच्या पाठिशी; एका मताने बाजी पलटली!

एम पूर्व प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस धावून गेली आहे. काँग्रेसचं एकमेव मतदान निर्णायक ठरलं आणि सेनेच्या नगरसेविका निधी प्रमोद शिंदे यांची प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून निवड झाली.

काँग्रेस शिवसेनेच्या पाठिशी; एका मताने बाजी पलटली!
SHARES

मुंबई महापालिकेच्या एम पूर्व प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीला काँग्रेस धावून गेली आहे. काँग्रेसचं एकमेव मतदान निर्णायक ठरलं आणि सेनेच्या नगरसेविका निधी प्रमोद शिंदे यांची प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून निवड झाली. या निवडणुकीत समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमएमआय या पक्षांच्या नगरसेवकांची मदत घेऊन पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. पण काँग्रेसने त्यांना साथ न दिल्याने सपाचे स्वप्न धुळीस मिळाले.


१६ प्रभाग समितीच्या निवडणुका

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समिती निवडणुकींपैकी १६ प्रभाग समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे एम/ पूर्व या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या प्रभाग समिती निवडणुकीसाठी सेनेच्या वतीने निधी शिंदे तर समाजवादी पक्षाकडून अख्तर कुरेशी हे निवडणूक रिंगणात होते. या प्रभागात शिवसेना ६, भाजपा १, काँग्रेस १, समाजवादी पक्ष ५, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि एमएमआय १ असे संख्याबळ आहे.


काँग्रेसने दिली शिवसेनेला साथ

शिवसेनेला भाजपाने पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ हे ७ झाले होते तर सपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमएमआय यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचेही संख्याबळ ७ झाले. परंतु काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी सेनेच्या शिंदे यांच्या बाजूने मतदान केल्याने ८ मतांनी शिंदे विजयी झाल्या आहेत.


सपाचं स्वप्न भंगलं

मागील प्रभाग समिती निवडणुकीत एमएमआयच्या नगरसेवकाने निवडणुकीत भाग न घेल्याने, संख्याबळ समसमान झाले होते. त्यामुळे चिट्ठीत सेनेच्या समृद्धी काते निवडून आल्या होत्या. त्यामुळे कुठेही चिठ्ठी न पडता आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सपाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी कंबर कसली होती. या निवडणुकीत काँग्रेस आपल्या सोबत येईल हे गृहीत धरून त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमएमआय यांना सोबत घेऊन मतांची मोट बांधली होती. परंतु, काँग्रेसने सेनेला मतदान करत सपाचा विजयाचा मार्ग कठीण करून सेनेचा विजय सुकर केला.



हेही वाचा

मुंबई महानगर पालिकेत इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा