Advertisement

शिवसेनेतील प्रवेश फळाला लागला! दिलीप लांडे सुधार समिती अध्यक्षपदी

दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप लांडे यांना बक्षीस म्हणून सुधार समिती अध्यक्षपद बहाल करण्यात आलं आहे.

शिवसेनेतील प्रवेश फळाला लागला! दिलीप लांडे सुधार समिती अध्यक्षपदी
SHARES

मुंबई महापालिकेच्या सुधार समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शुक्रवारी शिवसेना उमेदवार दिलीप लांडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत लांडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सुधार समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येत असल्याचं पिठासीन अधिकारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केलं. लांडे यांनी शिवसेनेत उडी मारून पुन्हा एकदा मानाचं पान मिळवलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत ते पहिल्यांदाच वैधानिक समितीचे अध्यक्ष बनले आहेत.


लांडे यांची कारकिर्द

दिलीप लांडे हे सर्वात पहिल्यांदा मार्च १९९७ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर कुर्ला येथून निवडून आले होते. त्यानंतर हा विभाग महिला उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने २००२ मध्ये या जागेवर त्यांच्या पत्नी शैला लांडे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या. २००२ ते २०१२ या कालावधीत शैला लांडे महापालिका सदस्य म्हणून निवडून आल्या.



मात्र मार्च २०१२ च्या निवडणुकीत दिलीप लांडे मनसेच्या तिकीटावर निवडून आले. महापालिकेत मनसेचे गटनेते म्हणून त्यांची निवड झाली होती. या पदासोबत बेस्ट समिती सदस्य आणि प्रभाग समिती अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवली.

मार्च २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर पुन्हा त्यांची महापालिका पक्ष गटनेतेपदी निवड झाली होती. परंतु काही महिन्यांनी मनसेचे संजय तुर्डे वगळता अन्य ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.


बक्षीस मिळालं

दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप लांडे यांना बक्षीस म्हणून सुधार समिती अध्यक्षपद बहाल करण्यात आलं आहे. दिलीप लांडे यांनी सुधार समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबईतील मंडईंच्या पुनर्विकासाला गती देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासीत केलं. मुंबई महापालिकेने भाड्याने दिलेल्या सर्व मालमत्तांचा आढावा घेऊन करार संपलेले भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले.



हेही वाचा-

मंगेश सातमकर यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा चौकार

सभागृह नेतेपदासाठी ३ माजी महापौरांमध्ये लढाई

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर यशवंत जाधव बसणार!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा