Advertisement

मंगेश सातमकर यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा चौकार

महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकर यांचा एकमेव अर्ज सादर झालेला असल्याने पिठासिन अधिकारी असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी नेमणूक केल्याचं घोषित केलं आहे.

मंगेश सातमकर यांचा शिक्षण समिती अध्यक्षपदाचा चौकार
SHARES

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगेश सातमकर यांनी चौथ्यांदा अध्यक्ष बनण्याचा बहुमान पटकावला आहे. प्रतिस्पर्धी सदस्यांकडून उमेदवारी अर्ज सादर करण्यात न आल्यामुळे सातमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 


अध्यक्षपदी नेमणूक केल्याची घोषणा

या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकर यांचा एकमेव अर्ज सादर झालेला असल्याने पिठासिन अधिकारी असलेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांची शिक्षण समिती अध्यक्षपदी नेमणूक केल्याचं घोषित केलं आहे. यापूर्वी कोणत्याही नगरसेवकांला हा मान मिळालेला नाही. सलग दोन वेळा शिक्षण समिती अध्यक्ष बनण्याचा मानही त्यांच्याच नावावर आहे.

इतक्यांदा आले निवडून

मंगेश सातमकर हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. डिसेंबर १९९४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते प्रथम निवडून आले होते. त्यानंतर सन २००२ ते सन २०१२ पर्यंत ते नगरसेक होते. त्यानंतर सन २०१७ मध्ये ते पुन्हा शीव येथील प्रभाग क्रमांक १७५ मधून निवडून आले आहेत.

सातमकर यांच्या कारकिर्दीत

मंगेश सातमकर हे सन २००४-०५मध्ये प्रथम शिक्षण समिती अध्यक्ष बनले होते. त्यानंतर प्रकाश आयरे यांना एक वर्ष समिती अध्यक्ष बनवण्याची संधी मिळाली. परंतु, त्यानंतर सन २००६-०७ आणि २००७-०८मध्ये सलग दोन वर्षे मंगेश सातमकर यांनी शिक्षण समिती अध्यक्षपद भूषवलं होतं. यानंतरच भाजपाच्या वाट्याला शिक्षण समिती गेली होती. सातमकर यांच्या शिक्षण समिती कारकिर्दीतच सुगंधी दुध, २७ शालेय वस्तूंचे वाटप आणि मुंबई पब्लिक स्कूलची योजना राबवण्यात आली होती.


काय म्हणाले मंगेश सातमकर?

शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झाल्यावर मंगेश सातमकर यांनी 'शिक्षण विभागात अमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करेन, असं म्हटलं आहे. राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा संपूर्ण राज्यासाठी अमलात आणला. परंतु, मुंबईसारख्या शहरात शिक्षण हक्क कायद्याच्या सर्व गोष्टींवर आपण अंमल करू शकत नाही. म्हणून शक्य त्याठिकाणी आपण काही अटी शिथिल केल्या पाहिजेत आणि त्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाशी मी या विषयावर पाठपुरावा करेन'. 

शिवाय 'सरसकट शाळा अनधिकृत करणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहता कामा नये, प्रत्येक बालकास आपण शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे. अशावेळेस सरसकट शाळा अनधिकृत घोषित करणे हा परस्पर विरोधाभास असल्याचं नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.


हेही वाचा - 

सभागृह नेतेपदासाठी ३ माजी महापौरांमध्ये लढाई

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या खुर्चीवर यशवंत जाधव बसणार!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा