Advertisement

कसली एकनिष्ठा? जाणून घ्या, मनसेची साथ सोडणाऱ्यांची राजकीय पार्श्वभूमी


कसली एकनिष्ठा? जाणून घ्या, मनसेची साथ सोडणाऱ्यांची राजकीय पार्श्वभूमी
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी एकनिष्ठ असल्याचं छाती ठोकून सांगणाऱ्या मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे, अश्विनी अशोक माटेकर, दत्ता नरवणकर तसेच अर्चना संजय भालेराव या ६ नगरसेवकांनी एक स्वतंत्र गट करून मनसेला 'राम राम' करत शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे मनसेकडे आता कुर्ला येथील प्रभाग १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक उरले आहेत.

महापालिका निवडणूक मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी तुर्डे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तरी कोणालाही न घाबरता आपले कार्य पुढे चालू ठेवणाऱ्या या नगरसेवकाने आपल्या एकनिष्ठतेची पोचपावतीच दिली आहे. सत्तेच्या घोडेबाजारात सामील न होणारे तुर्डे येत्या काळात मनसेचा खरा 'कोहिनूर हिरा' म्हणून ओळखले जातील, असं म्हटलं जात आहे.


'हे' गेले शिवसेनेसोबत

१) दिलीप (मामा) लांडे: मुंबई महापालिकेत मनसेचे गटनेते असलेले दिलीप लांडे प्रथम १९९७ ते २००२ आणि त्यानंतर मार्च २०१२ ते आतापर्यंत तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून आले आहेत. तर २००२ ते २०१२ या काळात त्यांच्या पत्नी शैला लांडे या दोनदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे १९९७ पासून सलग लांडे घराण्याचा नगरसेवक कुर्ला विभागात आहे.



  • मागील महापालिकेत लांडे यांचे गटनेतेपद काढून संदीप देशपांडे यांना देण्यात आले होते. परंतु नव्या महापालिकेत पुन्हा मामा लांडे यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. पण स्थायी समितीच्या अनेक सभांना लांडे गैरहजर राहत असत. शिवाय जिथे शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी येईल, तेव्हा ती भूमिका ते पार पडत असत.
  • चार दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महापालिकेत आयुक्तांना भेटण्यास आले होते. त्याची कल्पना गटनेते लांडे यांना देण्यात आली नव्हती. आयुक्तांच्या भेटीपूर्वी एक तास अगोदर लांडे यांना कल्पना देण्यात आली होती. त्यामुळे लांडे प्रचंड नाराज होते.


२) अश्विनी माटेकर: मनसेचे कुर्ला-पवईतील मनसेचे विभागप्रमुख अशोक माटेकर यांच्या पत्नी अश्विनी माटेकर या प्रथमच नगरसेवक म्हणून आल्या. 



  • पवई साकीविहार येथील प्रभाग क्रमांक १५६ मधून त्या निवडून आल्या आहेत. मात्र, सहा महिन्यांमध्ये सभागृहात कोणताही शब्द त्यांनी उच्चारलेला नाही.


३) दत्ता नरवणकर: वरळीतील मनसेचा एकनिष्ठ शाखाप्रमुख म्हणून ओळख असलेल्या दत्ता नरवणकर हे वरळीतील प्रभाग क्रमांक १९७ मधून निवडून आले. 



  • सातत्याने विविध कामांसाठी ठरावाच्या सूचना मांडून त्यांनी प्रभागात चांगल्या कामांची छाप टाकली.


४) हर्षला मोरे: एकेकाळी राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते आशिष मोरे यांच्या पत्नी हर्षिला मोरे या धारावीतील प्रभाग क्रमांक १८९ मधून मनसेच्या तिकीटावर निवडून आल्या. 

  • आशिष मोरे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रथम राष्ट्रवादीतून खूप प्रयत्न केला. परंतु उमेदवारी मिळत नसल्यामुळे त्यांनी भाजपाचेही दरवाजे ठोठावले होते. पण तिथेही तिकीट न मिळाल्याने त्यांनी कृष्णकुंजवर धाव घेऊन मनसेकडून उमेदवारी मिळवली.
  • त्यांनी माजी आमदार सुरेश गंभीर यांच्या मुलीचा पराभव करून धारावीत प्रथमच मनसेचा नगरसेवक निवडून आणला. महापालिकेतील प्रत्येक सभा आणि समित्यांच्या सभेत न चुकता उपस्थित राहत असल्या तरी एकाही बैठकीत त्यांनी तोंड उघडलेले नाही.


५) डॉ. अर्चना भालेराव: मनसेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांनी घाटकोपर पश्चिम येथील श्रेयस सिनेमा परिसरातील प्रभाग क्रमांक १२६ मधून आपली पत्नी डॉ. अर्चना भालेराव यांना निवडून आणले.



  • सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या सभांमध्ये त्यांची हजेरीही नेमकीच असून संजय भालेराव हेच सर्व काम पाहत असतात. मागील महापालिकेत प्रकाश दरेकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मनसेच्या काही नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
  • संजय भालेराव यांच्याकडे याबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांनी त्वरीत कृष्णकुंजवर पहिली टिप देऊन आपली एकनिष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु हीच एकनिष्ठता भालेराव यांनी या महापालिकेत गहाण ठेवल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.


६) परमेश्वर कदम: घाटकोपर पूर्व येथील माता रमाबाई नगरमधील प्रभाग क्रमांक १३३ मधून मनसेचे नगरसेवक परमेश्वर कदम हे पुन्हा निवडून आले आहेत. 



  • यापूर्वी त्यांची पत्नी मंगला कदम आणि त्यापूर्वी ते स्वत: नगरसेवक होते. कधी शिवसेनेत तर कधी मनसेत असाच त्यांचा प्रवास असल्यामुळे कदम यांच्या एकनिष्ठेचा फुगा केव्हाच फुटला होता.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा