Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात - अशोक चव्हाण


मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात - अशोक चव्हाण
SHARES

मुंबई - राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या माघारीवर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी भाजपाने पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवला आहे. मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त करण्यापेक्षा राज्यातले सरकार वाचवणे ही प्राथमिकता असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आपली खुर्ची टिकवण्याला महत्त्व दिले आहे. शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रचारात झालेले आरोप प्रत्यारोप हे फक्त मतदारांचे लक्ष विचलीत करण्यासाठी केलेले नाटक आहे, हे आमचे म्हणणे खरे ठरले तर आहेच परंतु भाजपा हा जनतेकरिता विश्वासघातकी पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात भाजपा शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. शिवसेना हफ्तेखोरांचा पक्ष असून, मुंबई महापालिकेतून मिळणाऱ्या टक्केवारीवर शिवसेना चालते अशी टीका भाजपा नेत्यांनी केली होती. मग आता निवडणुकीतून माघार घेऊन या माफिया, हफ्तेखोर, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात मुंबईकरांना का सोपवले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना द्यावे असे अशोक चव्हाण यांनी म्हणत भाजपा आणि शिवेसेनेवर जोरदार टीका केली.

दरम्यान, भाजपाने महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेणं म्हणजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराला समर्थन देणं आणि मुंबईकरांना धोका देणं आहे. हीच भाजपाची पारदर्शकता आहे का? अशी टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांविरुद्ध लढले. एकमेकांवर निवडणुकीत आरोप प्रत्यारोप केले. भाजपाचे कार्यकर्ते नेहमी म्हणत आले आहेत की शिवसेना भ्रष्टाचार करणारा आणि हफ्ताखोर पक्ष आहे. मग, शिवसेनेला त्यांनी महापौर पदासाठी समर्थन आणि पाठिंबा का दिला. ही मुंबईकरांची फसवणूक आहे. मुंबईकर शिवसेना आणि भाजपाला कधीच माफ करणार नाही, अशा शब्दात संजय निरुपम यांनी टीका केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा