Advertisement

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचा सन्मान महामोर्चा


संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचा सन्मान महामोर्चा
SHARES

कोरेगाव-भीमा दंगल घडवण्यात संभाजी भिडे यांचा काहीही संबंध नसल्याने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घ्या, मिलिंद एकबोटे यांची सुटका करा आणि भिमा कोरेगाव हिंसाचारात मृत पावलेल्या राहुल फटांगळेच्यां कुटुंबियांना न्याय द्या या प्रमुख मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठानच्या समर्थकांनी २८ मार्चला मुंबईसह राज्यभरात सन्मान मोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदान असा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत आझाद मैदानात सभेला परवानगी दिल्याने शिवप्रतिष्ठानचे समर्थक आझाद मैदान इथं जमले.


भिडेंना क्लिनचीट

कोरेगाव-भीमा इथं घडलेल्या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना अटक झाल्यानंतर संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करताना भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एल्गार मोर्चा काढून सरकारला अल्टिमेटम दिला. आंबेडकर यांच्या इशाऱ्यानंतर भिडे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भिडे यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याने त्यांना अटक केलेली नाही, असं म्हणत क्लिनचीट दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अन्वये मांडलेल्या कायदा आणि सुव्यवस्था प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही क्लिनचीट दिली.


शिवप्रतिष्ठानचा आरोप

कोरेगाव-भीमा प्रकरणात सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात असून संभाजी भिडे यांना जाणिवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने या मोर्चाचं आयोजन केलं. त्यानुसार २८ मार्च रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.


'आम्ही असे प्रकार करत नाही'

प्रकाश आंबेडकर या बुद्धिवाद व्यक्तींनी असे आरोप करणे दुर्देव असल्याचं सांगत शिवप्रतिष्ठानने कधीच दंगलीचा प्रकार केला नसून आमचा इतिहास तपासावा, असं आवाहनही केलं. कोरेगाव भीमा दंगलीनंतर जे नुकसान झालं, ते ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्याकडून भरून काढावं, असं सांगतानाच ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नये, अशी मागणी देखील शिवप्रतिष्ठानने केली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा