अखेर तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी


SHARE

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून विधानसभा निवडणुकीसाठी लढविणाऱ्या आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. या मतदार संघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं 'मातोश्री' निवासस्थान आहे. दरम्यान, तृत्पी सावंत यांची पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.


गणित फिसकटलं

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचं जागावाटपाचं गणित फिसकटल्यानं अनेक ठिकाणी जागांची अदलाबदल झाली. त्यामुळं दोन्ही पक्षातील इच्छुकांनी सुमारे पाऊणशे मतदारसंघात बंडाचं निशाण उगारलं आहे. त्यानुसार, वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.


अपक्ष उमेदवारी अर्ज

जागावाटपात वांद्रे पूर्व मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला असून या मतदारसंघातून शिवसेनेनं विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी न देत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना रिंगणात उतरवलं. त्यामुळं तृप्ती सावंत नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी तिकिटासाठी प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत सावंत यांचं मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांनी माघार न घेता प्रचार सुरूच ठेवला आहे.


पक्षातून हकालपट्टी

याआधी नाशिकमध्ये ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांची पक्षातून तातडीनं हकालपट्टी करण्यात आली होती. राज्यातील अनेक बंडखोरांवरही तत्परतेनं कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, सावंत यांच्यावर कारवाई करण्याचं पक्ष नेतृत्वानं टाळलं होतं. मात्र, अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुला

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या