विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये तुफान राडा झाला. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली.
या गोंधळात बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर देखील दाखल झाले होते. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील त्या ठिकाणी होते. या गोंधळाबाबत राजन नाईक यांनी नेमकं काय झालं हे सांगितले.
'बविआ'चे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले आहेत. "राष्ट्रीय सरचिटणीसांना कायदा नियम माहिती नाही का? वाड्याला गेले तिकडून 5 कोटी रुपये घेऊन इकडे आले. त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात, लॅपटॉप मिळालेत. त्यात सगळे हिशोब आहे. कोणत्या लायकीचे लोक आहेत हे? हे शिक्षणमंत्री होते आपले. यांना लाज शर्म वाटते की नाही?" असा सवाल हिंतेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे.
क्षितीज ठाकूरांसह बविआ कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घूसून विनोद तावडे यांनी घेरलं होतं. तसेच यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले. यानंतर एकच गोंधळ उडाला. विनोद तावडे हे कशासाठी आले होते, याची माहिती उमेदवार राजन नाईक यांनी दिली.
राजन यांनी सांगितले की, विनोद तावडे यांची प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू होती. मतदानासाठी मतदारांना कसे उतरावे, मतदानाच्या दिवशी कशी खबरदारी घ्यावी, कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी कोणती काळजी घ्यावी या संबंधी मार्गदर्शन विनोद तावडे करत होते.
मात्र, त्याच वेळी अचानक बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे पैसे कोणी आणले, कोणाचे आहेत याची चौकशी करा. मात्र, आमचा आणि पैशांचा संबंध नसल्याचेही राजन नाईक यांनी सांगितले.
हेही वाचा
महाराष्ट्राच्या 29 टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी