Advertisement

Cyclone nisarga: पुढचे २ दिवस धोक्याचे, घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

उद्या आणि परवाचे २ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडू नका. या संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

Cyclone nisarga: पुढचे २ दिवस धोक्याचे, घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे
SHARES
Advertisement

एकामागून एक संकट येत आहे. कोरोनाच संकट आहेच. निसर्ग आपली परीक्षा घेण्याचं सोडत नाही आहे. या परीक्षेमध्ये ताकदीने सामोरे जाऊन त्यातून बाहेर पडायचं आहे. उद्या आणि परवाचे २ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घराबाहेर पडू नका. या संकटाच्या छाताडावर चाल करून आपल्याला जायचं आहे. या संकटाला धैर्याने सामोरे जाऊया आणि त्यातून सहीसलामत बाहेर पडूया, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं. निसर्ग चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला फेसबुक लाइव्हद्वारे संबोधित केलं. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले.

दोन दिवस पुन्हा बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विशेषत: किनारपट्टी असलेल्या भागात उद्या व परवा हे २ दिवस महत्त्वाचे आहेत. दोन्ही दिवस आपण घरामध्येच राहणं हिताचं आहे. जे कार्यालय, उद्योग, इतर गोष्टी सुरू झालेल्या असतील त्या गोष्टी उद्या व परवा बंद राहतील. घराबाहेर पडू नका. घराबाहेर न पडणं यातच आपलं हित आहे. हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी. वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एसडीआरएफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण जी तयारी केली आहे ती मनुष्यहानी किंवा प्राणहानी होऊच नये अशा पद्धतीने केलेली आहे. किनारपट्ट्यातील मच्छिमारांना संपर्क झालेला आहे. पालघरमधील काही मच्छिमार दुपारपर्यंत संपर्कात नव्हते, त्यांचाही संपर्क झाला असून त्यांना वेळेत परत आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि ते वेळेत परततील.

मुसळधार पाऊस पडणार

वादळ म्हटल्यानंतर पाऊस आलाच. मुसळधार पाऊस पडणार आहे. हा पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होऊ नये. पण भरपूर पाऊस पडल्यानंतर कदाचित आपल्याला काही ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करावा लागेल. जिथं आवश्यक नसेल तिथे विजेचे उपकरणं वापरू नका. 

मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी सुट्या पडलेल्या असतील, त्या घरामध्ये आणून ठेवा किंवा जिथल्या तिथं व्यवस्थित बांधून ठेवा की जेणेकरून त्या वाराच्या प्रभावाने उडणार नाहीत आणि कोणाला इजा करणार नाही, कुठे धोका होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

अफवा नको

वादळ धडकल्यानंतर पुढे भूप्रदेशात कसं जाईल, त्याची दिशा आपल्याला समजत जाईल तसं शासनाकडून आपल्याला सूचना येत राहतील. शासनाकडून वेळोवेळी दूरदर्शन, रेडिओ, एसएमएस वरून आपल्याला सूचना येत राहतील. कुठेही घाबरून वेडंवाकडं पाऊल टाकू नका. 

BKC मध्ये आपण फील्ड हॉस्पिटल तयार केलं आहे. या वादळाचा इशारा आल्यावर आपण तेथील रुग्णांना दुसरीकडे हलवलं आहे. आपण उभी केलेली शेड वॉटरप्रूफ आहे. पावसासोबत वादळ आलं, काही पडझड झाली तर पडलेल्या शेड बांधता येतील. पण मला कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा नाही होऊ द्यायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


संबंधित विषय
Advertisement