Advertisement

आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका, वांद्र्यातल्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा

वांद्रे इथल्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा उचलला. कुणीतरी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस सुरू होणार असं पिल्लु सोडलं. अफवा पसरवणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका, वांद्र्यातल्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा
SHARES

देशात कोरोनानं चांगलाच थैमान घातला आहे. यात मुंबईतील कोरोनाचा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांचं लॉकडाऊन लागू केलं होतं. पण आता ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

पण मंगळवारी दुपारी ४ वाजता वांद्रे पश्चिम इथं हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन वाढल्यामुळे कामगार नाराज होते. आता घरी जायला मिळणार नाही, म्हणून ते रस्त्यावर उतरले. गर्दीवर आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यासर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधला आणि वांद्रेतल्या घटनेवर भाष्य केलं.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे कामगारांनी काळजी करू नये. ज्याप्रकारे इतर राज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांची काळजी तिथलं प्रशासन घेत आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्रात अडकलेल्या मजदुरांची काळजी आम्ही घेत आहोत. कृपा करून यावरून कुणीही राजकारण करू नये. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका.

वांद्रे इथल्या घटनेत देखील कुणीतरी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस सुरू होणार असं पिल्लु सोडलं. या अफवेमुळे सर्व कामगार तिकडे जमले. त्यामुळे कुणी आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, आमच्याकडे आग विझवण्याचे बंब आहेत. असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

“पैसे कुठून काढायचे हे सांगू नका”

मुंबई महानगर पालिकेचे फिक्स डिपॉजिटमध्ये ४० हजार कोटी रुपये आहेत. राज्य सरकारनं ते वापरावेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सूचवलं होतं. यावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असं सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये, असा टोला त्यांनी लगावला. दररोज ६ ते ७ लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन

वांद्र्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. शहा यांनी घटनेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येणे ही काळजीचं कारण आहे. अशा घटना होऊ नयेत याची दक्षता घ्या. अशा घटनांमुळे भारताची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं.


देवेंद्र फडणवीसांची टिका

वांद्रे प्रकरणावर आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा