Advertisement

होय, मुंबईकरांच्या हितासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे

मेट्रो कारशेड. मी माझ्या मुंबईबद्दल, माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जरूर अहंकारी आहे. का नसावं अहंकारी?

होय, मुंबईकरांच्या हितासाठी मी अहंकारी- उद्धव ठाकरे
SHARES

मेट्रो कारशेडसाठी (mumbai metro car shed) राज्य सरकारने निश्चित केलेल्या प्रस्तावित कांजूरमार्ग येथील जागेच्या हस्तांतरणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देतानाच संबंधित जागेवर सुरू असलेलं काम थांबवण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले आहेत. या निर्णयानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडबद्दल भूमिका मांडताना विरोधकांना उत्तर दिलं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कोरोना आणि कारशेड या दोनच महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, सध्या ज्यावरून थयथयाट केला जातो तो कांजूरमार्गचा विषय... मेट्रो कारशेड. मी माझ्या मुंबईबद्दल, माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जरूर अहंकारी आहे. का नसावं अहंकारी? आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवलं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं ८०० एकरांचं मोठं जंगल केलं.

कांजूरचं काय प्रकरण आहे? तर ही ३० वजा ५ अशी २५ हेक्टर जागा आणि कांजूरची ४० हेक्टर जागा, म्हणजे सुरुवातीलाच २५ आणि ४० एवढा फरक! मला धक्का बसला की मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पात 'Stabling Line' चा प्रस्तावच नव्हता. आता आपण आरेच्या टोकावर जिथे Casting Yard आहे तिथे ही लाईन करतोय.

कांजूरची जागा आपण एवढ्यासाठी घेतली की आरेला फक्त मेट्रो ३ ची कारशेड होणार होती आणि कांजूरला मात्र ३, ४ आणि ६ या ३ लाईनच्या कारशेड आपण करू शकतो. काही फरक आहे की नाही आहे?

आरेमध्ये (aarey car shed) हे काम केलं तर पुढच्या ५ वर्षांत कमी पडणार आणि कांजूरला केलं तर पुढच्या ५०-१०० वर्ष आपण वापरू शकू. तुम्ही सांगा मला. हा अहंकार आहे की उपयोग? पण दुर्दैव का वाटलं मला? आपल्याविरुद्ध केंद्र सरकार कोर्टात गेलं. ते Salt Commissioner. कशासाठी जाताय? कशासाठी खेचाखेची करताय? राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर माझ्या राज्यासाठी, माझ्या जनतेच्या हितासाठी पुढच्या ५-५०-१०० वर्षांसाठी जे उपयुक्त राहील ते मी मुख्यमंत्री म्हणून करणार. ते माझं कर्तव्य आहे.

राज्याची हक्काची मोक्याची जागा, ज्याचा उल्लेख कदाचित जगातील सर्वात महागडा भूखंड असा होऊ शकेल असा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सचा काही हजार कोटींचा भूखंड आपण बुलेट ट्रेनला दिला. त्याच्यावरचं International Finance Centre हे इतर राज्यात गेलं. आम्ही खळखळ नाही केली.

बुलेट ट्रेनला विरोध होतोय त्या शेतकऱ्यांना मी भेटलो, वाढवणला विरोध होतोय त्या शेतकऱ्यांना मी भेटलो. शेतकऱ्यांना नुसतं अडवून ठेवायचं, त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारायचे, असं नाही चालणार, ही लोकशाही नाही.

माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे "चला, या... आम्ही तुम्हाला याचं श्रेय द्यायला तयार आहोत. कांजूरचा (kanjurmarg) प्रकल्प तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही हा प्रश्न सोडवा, कारण हा प्रश्न एकत्र चर्चेला बसलो तरी सुटू शकतो." इथे माझ्या इगोचा विषय नाही आहे आणि तुमच्याही असता कामा नये.

केंद्राचे कोणतेही प्रकल्प येतात तेव्हा आपण खळखळ न करता जागा देतो मग भले ही जमीन केंद्राची असेल नसेल हा वाद आपण सोडू शकतो. तिथे बिल्डर गेलेले आहेत. वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची? मग वाद सोडवणार कोण? कोणाच्या घश्यात ही जागा जाणार? बिल्डरच्या?

त्या पेक्षा केंद्राने आणि राज्याने जर एकत्र बसून हा वाद सोडवायला हवा. आपण ही राज्याची जागा, जनतेची जागा जनतेच्याच उपयोगात आणू इच्छित असू तर त्यावरून खेचाखेची कशाला?

असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपला एकत्र येऊन चर्चेचं आवाहन केलं.

(maharashtra cm uddhav thackeray replies bjp over kanjurmarg mumbai metro car shed)

हेही वाचा- निसर्ग वाचवणं यात कोणता अहंकार? संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा