Advertisement

महाविकास आघाडीने राखलं आरेचं जंगल- उद्धव ठाकरे

जंगल उजाड करून शहरं वसवली गेल्याचं आपण पाहिलं असेल, पण शहरामध्ये जंगल राखण्याचं काम हे तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं आहे.

महाविकास आघाडीने राखलं आरेचं जंगल- उद्धव ठाकरे
SHARES

जंगल उजाड करून शहरं वसवली गेल्याचं आपण पाहिलं असेल, पण शहरामध्ये जंगल राखण्याचं काम हे तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड आणि मेट्रो प्रकल्पावरून राजकारण करणाऱ्यांना सुनावलं. दादर येथील सावरकर स्मारक इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. (maharashtra cm uddhav thackeray spoke on politics over metro aarey car shed in shiv sena dussehra rally speech)

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष होतं. आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि हिंदुत्व आणि बाॅलिवूडवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, एक निर्णय आपण घेतला, तो म्हणजे आरेचं जंगल वाचविण्याचा! जवळपास ८०८ एकर जंगल आपण वाचवलं आहे, हे असं उदाहरण संपूर्ण जगात दुसरीकडे कुठेही नसेल. जंगल उजाड करून शहरं वसवली गेलेली आहेत पण शहरामध्ये जंगल राखणं हे तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने केलं आहे.

मेट्रोची कारशेड, तिथे रातोरात झाडांची कत्तल करून तिकडे करणार होते. ती कारशेड, मी आल्याआल्या पहिली त्याला स्थगिती दिली, त्यानंतर अभ्यास झाला. आता अभ्यास किती काळ करायचा? तुमचं सरकार गेलं तरी तुमचा अभ्यास होत नाही त्याला मी काय करू? आपण ती कारशेड कांजूरमार्गला नेतोय. एक रुपया खर्च न करता सरकारची जमीन आपण मेट्रोसाठी घेतली आहे, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला.

दरम्यान आरे कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झाले असल्याचा दावा करणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांचा दावा, आरे वाचवा आंदोलनाचे पुरस्कर्ते आणि पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी खोडून काढला आहे. एवढंच नाही, तर उरलेले ३३० कोटी रुपये कुठे गेले असा प्रश्नही फडणवीस यांना विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो ३ चं आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची घोषणा केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर त्यांनी काही कागदपत्रांच्या आधारे मोठा खर्च वाया जाणार असल्याचा दावा देखील केला होता.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा