Advertisement

रामाच्या नावानं…

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचं औपचारिक निमंत्रण मिळणार, हे निश्चित झाल्यानंतर चर्चेवर पडदा पडेल, असं वाटत होतं. पण रामाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

रामाच्या नावानं…
SHARES

अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त एकदाचा ठरला! वादाच्या, चर्चेच्या असंख्य फैरी झडल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार रामजन्मभूमीत राम मंदिराची वास्तू उभारता येणार आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर वर्षानुवर्ष सुरु असलेल्या कायदेशीर लढाईला पूर्णविराम मिळाला. मात्र, या विषयावरचं राजकारण अजूनही चवीने चघळलं जात आहे. मंदिर भूमिपूजनाची तारीख ठरल्यानंतर याची प्रचिती पुन्हा एकदा आली. खरं तर देशात आणि जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’ महामारीचा या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न विविध स्तरांवर युद्धपातळीवर सतत सुरू आहेत. अशा परिस्थितीत कोरोना व्यतिरिक्त कोणताही मुद्दा हा चर्चेच्या ट्रॅकवर येणार नाही, असं वाटत होतं. पण राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्याने असा गियर टाकला की, चर्चेची गाडी काही काळापुरती राममंदिराच्या रुळावर आली. राज्यातल्या शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या चार प्रमुख पक्षांचे नेतागण स्वाभाविकपणे या चर्चानाट्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा बनले.    

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोलापुरात एका पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना राम मंदिर भूमिपूजनाबाबत प्रश्न विचारला गेला. उत्तर देताना पवार यांनी, काही जणांना राम मंदिर बांधलं म्हणजे कोरोना निघून जाईल, असं वाटतं. कोरोनामुळे उद्भवलेली बिकट परिस्थिती, लॉकडाउनमुळे ढासळत चाललेली अर्थव्यवस्था आदींचा हवाला देत कोरोना हद्दपार करण्याला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. इथेच नव्या वादाची ठिणगी पडली.

चर्चेचं ‘रामायण’

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी राम मंदिरासाठी अनुकूल अशी स्वतःची आणि पर्यायाने स्वतःच्या  पक्षाची भूमिका वारंवार मांडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर आता भिन्न विचारांच्या पक्षांशी सोयरीक टिकवून त्यांना भूमिका मांडावी लागणार आहे. कोरोनामय वातावरणात राज्याचे मुख्यमंत्री श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या गाठतील का? आणि त्यांनी तसं करावं का? हे प्रश्न विविध स्तरांतून विचारले गेले. राज्यातल्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनीसुद्धा बॉल उद्धव यांच्याच कोर्टात ढकलला. काँग्रेस नेता आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असल्याची ‘सावध’ प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य अयोध्यावारीत आक्षेप घेण्याचं कारण नाही, या पूर्वार्धाला आपल्याला मशिदीत जाण्यापासून कुणी रोखलं तर रुचणार नाही या उत्तरार्धाची जोड दिली आणि मुद्दा अलगद धार्मिक भावनांच्या काठावर आणून  ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी खासदार माजिद मेमन यांनी मात्र ट्विट करून राज्याच्या प्रमुखाने धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं टाळायला हवं, हा सल्ला देऊन टाकला. हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री मात्र व्यक्त होतच नव्हते. पण त्यांच्या पक्षाचे दोन खासदार, संजय राऊत (राज्यसभा) आणि राहुल शेवाळे (लोकसभा) यांनी मात्र उद्धव अयोध्येला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्यावारीबद्दल इतकं बोललं जात असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना भूमिपूजन कार्यक्रमाचं निमंत्रित केलं जाणार आहे की नाही? याबाबतही सस्पेंस कायम होता. पण ‘लेखणी’ आणि ‘वाणी’ या दोन अस्त्रांवर प्रभुत्व असणाऱ्या संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना अयोध्यावारी करण्यासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचं जाहीर करून टाकलं. नंतर बातमी आली की, भूमिपूजन कार्यक्रमाच्या ३०० निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे. खरं-खोटं ठाऊक नाही. पण निमंत्रितांच्या यादीची माहिती षट्कर्णी झाल्यानंतर अनेकांनी आपसात गप्पा मारताना,”बघा, मी बोललो होतो की नाही?“ छापाची प्रतिक्रिया दिली.

बरं... १. महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? २. महागाई कमी होणार का? ३. महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? ४. बेरोजगारांना रोजगार मिळणार का? ५. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? ६.शेतीमालाला हमी भाव मिळणार का? ७. महाराष्ट्रातला दुष्काळ थांबणार का? ८. मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का? ९. महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? १०. खिशातले राजीनामे बाहेर पडणार का? ही प्रश्न दशमी आठवते? डोक्याला फार ताण देण्याची गरज नाही. २०१८ साली भाजपा – शिवसेना युती सत्तेत असताना शिवसेना पक्षप्रमुखांनी अयोध्यावारीची घोषणा केली होती. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘धनुष्यबाण’वाल्यांवर प्रश्नबाणांचा वर्षाव झाला होता. श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या वादात मात्र ‘मनसे’ उडी पडली नाही.

कवित्व सुरुच...

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचं औपचारिक निमंत्रण मिळणार, हे निश्चित झाल्यानंतर चर्चेवर पडदा पडेल, असं वाटत होतं. पण रामाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सोलापुरात शरद पवार यांनी केलेल्या विधानाला विरोध नोंदवण्यासाठी भाजपाच्या राज्यातल्या युवा मोर्चाने शरद पवार यांच्या मुंबई निवासस्थानाच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्रं पाठवण्याचा संकल्प वाजतगाजत केला. पण तितक्यात... देशाचे उप राष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा खासदार  छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून झालेल्या शपथ ग्रहण कार्यक्रमानंतर आपल्या चेंबरमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी ‘ या किंवा अन्य कुठल्याही घोषणा न देण्याबाबत समज दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर प्रचारात करणाऱ्या भाजपाची ही दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप करत लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उप राष्ट्रपतींना ‘जय भवानी, जय शिवाजी ‘ लिहिलेली १० लाख पत्रं पाठवण्याचा प्रति संकल्प केला. फिट्टमफाट!

कोरोनाचं संक्रमण झपाट्याने होत असताना देशात श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाऐवजी रुग्णालयं बांधली जायला हवीत, असाही युक्तिवाद एका वर्गाकडून केला जात आहे. तर या देशात अध्यात्म आणि विज्ञान दोन्हींमध्ये ‘शास्त्र’ असल्याचे दाखलेही दिले गेले आहेत. हे सर्व घडत असताना श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने सदर याचिका फेटाळली.

१९८७ साली आपले ‘भारत कुमार’ आय मीन मनोज कुमार यांनी ‘कलियुग का रामायण’ नावाचा चित्रपट काढला होता. सिनेमा सपशेल आपटला. त्याच्या खोलात नको जायला. पण ‘राम’ नामाबरोबर ओघाने रंगणारं चर्चेचं गुऱ्हाळ, रंगणारं राजकारण पाहता आजही हे शीर्षक एखाद्या चित्रपटासाठी शोभू शकतं. कोण जाणो... एखाद्या निर्मात्याने टायटल स्वतःसाठी बुक करून ठेवलं असेलही! गेले चार महिने ‘कोरोनाचा विळखा’ ही ज्वलंत समस्या समोर असताना भारत-चीनमधली युद्धजन्य परिस्थिती, अभिनेता सुशांत सिंह राजपूतची चटका लावणारी एक्झिट, बच्चन कुटुंबीयांवर नानावटीत सुरू असलेले उपचार हे सर्व मुद्दे चर्चेत येत राहिले. या गर्दीतही श्रीराम मंदिराच्या ५ ऑगस्ट रोजी नियोजित सोहळ्यावर चर्चा, वाद, मत-मतांतराच्या नौबती झडल्या. त्रेतायुगातला एकवचनी, एकबाणी श्रीराम आजही कालातीत आहे, तो तसाच राहणार. आणि हो...! कोरोनाला निष्प्रभ करणारा ‘रामबाण’ उपायही आपणच शोधून काढणार. मला खात्री आहे. 

जाता जाता...

सोशल मीडिया युनिव्हर्सिटीत कमालीचा व्हायरल झालेला विनोद... नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की राम हा नेपाळचा होता आणि खरी अयोध्या ही नेपाळ मध्येच आहे. या आठवड्यात सांगतील की, फ्रान्सचा नेपोलियनसुद्धा नेपाळचा होता आणि त्याचं खरं नांव नेपाळीयन होतं. ८०% नेपाळी आपलं आडनांव थापा का सांगतात, ते आता कळलं. आजच्या राजकारणात ‘राम’ राहिला नाही, असं सरसकट विधान नाही करता यायचं. आपला श्रीराम राज्य, देशाच्या परीघाबाहेरचा आहे, हे सांगायला एवढं पुरेसं आहे. नाही का? चालायचंच. राम राम.

 


लेखक News 24 आणि E24 या राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिन्यांचे निवासी संपादक आहेत. दोन दशकांपेक्षा अधिक काळ प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, रेडियो, वेब मीडियात काम करण्याचा अनुभव असलेले पत्रकार, पुरस्कारप्राप्त लेखक, फिल्ममेकर आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक म्हणून ते परिचित आहेत.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा