Advertisement

महाराष्ट्र मॅग्नेटिक नाही, पथेटीक झालाय- अशोक चव्हाण


महाराष्ट्र मॅग्नेटिक नाही, पथेटीक झालाय- अशोक चव्हाण
SHARES

राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेचं नुकतंच आयोजन केलं. यांत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा दावा सरकार करत आहे. वास्तवात मात्र गुंतवणुकीचा हा आकडा फसवा आहे. सततच्या या आयोजनांमुळे महाराष्ट्र मॅग्नेटिक नाही, तर पथेटीक झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली. सोबतच राज्यातील गुंतवणुकीचं खरं चित्र दाखविण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. चव्हाण आझाद मैदानालगत असलेल्या काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


महाराष्ट्रात काळाकुट्ट अंधार

एकीकडे भव्यदिव्य इव्हेंट आयोजित करायचे, तर दुसरीकडे खोटी आकडेवारी, घोषणा करून जनतेची फसवणूक करायची. राज्य सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे, चुकीच्या प्राथमिकतेमुळे शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्या करावी लागत आहे. सुशिक्षित बेरोजगार हैराण होऊन आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. यामुळे महाराष्ट्रात काळाकुट्ट अंधार पसरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.


'हायपरलूप' म्हणजे 'मिस्टर इंडिया'

मॅग्नेटिक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गाजावाजा झाला तो म्हणजे हायपरलूप प्रकल्पाचा. मात्र हा प्रकल्प म्हणजे 'मिस्टर इंडिया' असून महाराष्ट्र राज्य त्याचं प्रथम दर्शन करणारे राज्य असल्याचा चिमटा अशोक चव्हाण यांनी काढला. इतक्या मोठ्या प्रकल्पाचं नेमकं नियोजन काय ? पैसा कुठून आणणार हे प्रश्न अनुत्तरीतच राहत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


नवी जुमलेबाजी

सरकारने मेक इन इंडियामध्ये अपेक्षित गुंतवणूक आणि रोजगार यांचा साध्य झालेला आकडा समोर ठेवावा आणि मगच मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या गमजा कराव्यात, असा टोलाही त्यांनी लगावला. २०१९ च्या निवडणुकांसाठीची ही जुमलेबाजी असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा