Advertisement

“चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?”

चंद्रकांत पाटलांनी भान ठेवून बोलावं. भाडोत्री ट्रोलप्रमाणे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढले तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

“चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?”
SHARES

भाडोत्री ट्रोलप्रमाणे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढले, तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल, असा इशारा देतानाच चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे? असा प्रश्न नाना पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (chandrakant patil) पाटील यांना विचारला आहे.

कोविशील्ड लशीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटने नुकतेच आपल्या लशीचे दर जाहीर केले आहेत. यानुसार ही कंपनी कोविशील्ड लस केंद्र सरकारला १५० रुपयांना, राज्य सरकारला ४०० रुपयांना, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना विकत देणार आहे. देश एकच असताना लस विक्रीत ही तफावत का? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावर सीरम पारदर्शीपणाने लशीची किंमत जनतेसमोर ठेवत असताना आणि इतर देशांच्या तुलनेत सीरमची लस स्वस्त: असतानाही राहुल गांधी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. त्यांची ही भूमिका देशविरोधी आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना नाना पटोले म्हणाले की, कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ, हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाचा (coronavirus) मुकाबला करण्यासाठी सकारात्मक सूचना केल्या. पण त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्रातील मंत्री व भाजप नेते त्यांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत होते.

हेही वाचा- तर ते हवेतला आॅक्सिजन पण शिल्लक ठेवणार नाहीत, नितेश राणेंची पवारांवर टीका

काँग्रेस (congress) नेत्यांचे सल्ले वेळीच ऐकलं असतं, तर आज देशाचं स्मशान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशी नक्कीच झाली नसती. राज्यातील भाजपचे नेते तर या संकटकाळात लोकांच्या मृतदेहावर उभे राहून आपल्याला पुन्हा सत्ता मिळवण्याचा काही मार्ग सापडतोय का? याच्या शोधात आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी तर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्यावर टीका करत केंद्र सरकारचा गलथानपणा आणि अपयशावर पांघरून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

देशातील अनेक उच्च न्यायालयांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संकटाळातील केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले आहेत. केंद्र सरकारने औषधे, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिवर, व्हेंटिलेटर यांच्या वाटपावर नियंत्रण ठेवून संकटकाळात व्यापार सुरु केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजप (bjp) नेत्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला होता जो पोलिसांनी उधळून लावला.

काँग्रेस पक्षाने १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करताना चलाखी करत लस पुरवठ्याची आपली जबाबदारी झटकून ती राज्य सरकारांवर ढकलली. एकाच लसीच्या अशा तीन वेगवेगळ्या दरांना मान्यता देऊन केंद्र सरकार नफेखोरीला प्रोत्साहन देत आहे. 

या संदर्भात राहुलजी गांधी यांनी आवाज उठलला तर चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या? चंद्रकांत पाटलांनी भान ठेवून बोलावं. भाडोत्री ट्रोलप्रमाणे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढले तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

(maharashtra congress president nana patole slams chandrakant patil over covid 19 vaccination)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा