Advertisement

मुंबईतल्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी डबेवाल्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबईतल्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचे घर, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन
SHARES

मॅनेजमेंट गुरू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवासयोजनेंतर्गत घरे देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. 

मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे आणि कौशल्याचे जगभरात कौतुक होत आहे. गेल्या १३० वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डबेवाल्यांना हक्काचे घर मिळावे. अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलबित होती. महाविकास आघाडी डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. डबेवाल्यांच्या घरासाठी आणि त्यांच्या कार्यालयासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करावी असे आदेश पवारांनी दिले. डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी. त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी डबेवाल्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकित अधिकाऱ्यांना दिल्या. ‘येत्या काही दिवसात आम्ही आपल्याला भूखंडाची यादी देऊ व आपणास योग्य वाटेल त्या भूखंडाची निवड करता येईल. तसेच लवकरात लवकर मुंबईत डबेवाला भवन उभे राहिल असे आश्वासन अजित पवार यांनी डबेवाल्यांना दिले.

त्याच बरोबर डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले आहेत. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव व इतर अधिकारी, मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रामदास करवंदे तसेच उपाध्यक्ष सबाजी मेदगे यांच्यासह डबेवाल्यांच शिष्टमंडळ उपस्थित होते.

 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा