Advertisement

नगरसेवकांच्या मानधनात 150 टक्के वाढ!


नगरसेवकांच्या मानधनात 150 टक्के वाढ!
SHARES

मुंबईतील नगरसेवकांना दिले जाणारे मानधन अखेर वाढले. पाच वर्षांपूर्वी मागणी केल्याप्रमाणे मुंबईच्या नगरसेवकांना 15 हजार रुपये वाढवून देत 25 हजार रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय राज्य सरकारनेे घेतला असून शनिवारी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे तब्बल 150 टक्के वाढ नगरसेवकांना दिली असली तरी नगरसेवकांना मात्र हे मानधन मासिक 50 हजार रुपये हवे आहे. त्यामुळे या मानधनवाढीमुळे नगरसेवकांमध्ये 'आधी खुशी आधा गम' अशीच अवस्था झाली आहे.

मुंबई महापालिकेत 227 आणि पाच नामनिर्देशित सदस्य असे एकूण 232 नगरसेवक असून त्यांना 2005 च्या शासन निर्णयानुसार मासिक 10 हजार रुपये मानधन मिळते. याशिवाय सभेच्या भत्त्यापोटी 150 रुपये एवढी रक्कम दिली जाते. वाढत्या महागाईमुळे नगरसेवकांना मिळणारी ही मानधनाची रक्कम तुटपुंजी असल्यामुळे महापालिका सभागृहात 31 जुलै 2012 मध्ये ठराव करून नगरसेवकांना 25 हजार रुपये एवढे मानधन देण्याची मागणी केली होती. तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीनुसार, हा ठराव सभागृहात मंजूर केल्यानंतर तत्कालीन महापौर सुनील प्रभू यांनी 6 ऑगस्ट 2012 ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे याबाबत पत्र पाठवले होते. परंतु नगरसेवकांच्या मानधनाबाबत मागील पाच वर्षांपासून निर्णय प्रलंबित होता.


आमदारांचे वाढले होते, पण....


राज्यात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे ते मानधन वाढवून देत नसल्याचा कांगावा तेव्हा पालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून केला जात होता. परंतु भारतीय जनता पार्टी-शिवसेनेचे सरकार येऊन अडीच वर्षे उलटली तरी या मानधनवाढीबाबत कोणत्याही प्रकारचे परिपत्रक काढण्यात आलेले नव्हते. दहा महिन्यांपूर्वी सरकारने आमदारांचे मानधन वाढ 75 हजार रुपयांवरून दीड लाख रुपये करण्याचा आणि निवृत्तीवेतन 40 वरून 50 हजार रुपये करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली.


नगरसेवकांच्या मागणीचा विचार


शिवसेना- भाजपाची सत्ता आल्यानंतरही मानधनवाढीचे परिपत्रक ना काढणाऱ्या सरकारने शनिवारी या मानधनात वाढ करण्यास मान्यता दिली. नगरसेवकांचे मानधन 150 टक्के वाढवले गेले आहे. त्यामुळे 10 हजार रुपये मानधन घेणाऱ्या नगरसेवकांना आता एकूण 25 हजार रुपये एवढे मानधन मिळणार आहे.


नगरसेवकांना हवे आहे 50 हजार रुपये मानधन


नगरसेवकांना मासिक 25 हजार रुपये मानधन देण्याचा ठराव करूनही हे मानधन वाढवून दिले जात नसल्यामुळे समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून नगरसेवकांचे मानधन 50 हजार रुपये आणि भत्त्यापोटी 500 रुपये मिळावे अशी मागणी केली आहे. वाढती महागाई आणि नगरसेवकांच्या प्रभागांच्या सीमा वाढल्या आहेत. तसेच प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक झटत असतो. मात्र, त्याला उत्पादनाचे अन्य कोणतेही साधन नसल्यामुळे मानधनापोटी देण्यात येणारी रक्कम तुटपुंजी असल्याचे रईस शेख यांनी म्हटले होते.


नगरसेवकांना हे मिळणार...


नगरसेवकांची संख्या : 227 + 5

सध्याचे मानधन : 10 हजार रुपये

नगरसेवक निधी : 60 लाख रुपये

विभाग विकास निधी : 1 कोटी रुपये

मोबाईल हँडसेट : मोफत

मोबाईल बिल : मासिक 1200

टोल नाक्यांवर प्रवेश : मोफत

बेस्ट बस प्रवास : मोफत


हेही वाचा

मुंबईच्या नगरसेवकांना हवंय 50 हजार रुपये मानधन



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा