Advertisement

विधानपरिषदेवर कुणाची वर्णी? राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष

राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यासाठी १२ नावांची यादी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता या यादीवर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानपरिषदेवर कुणाची वर्णी? राज्यपालांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष
SHARES

राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यासाठी १२ नावांची यादी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, अल्पसंख्याक कार्यमंत्री नवाब मलिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राजभवन इथं जाऊन बंद लिफाफ्यात ही यादी राज्यपालांना सादर केली आहे. आता या यादीवर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ४ अशा रितीने एकूण १२ नावं महाराष्ट्र विधान परिषदेत (maharashtra vidhan parishad) राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्य सरकारच्या वतीने सुचवण्यात आली आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही यादी राज्यपालांना सोपवण्यात आली असून राज्यपाल लवकरच या सदस्यांची नियुक्ती करतील, अशी अपेक्षा अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

राज्य सरकारकडून याआधीही काही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली होती. परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीला नकार दिला होता.

हेही वाचा- विधान परिषदेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरची शिफारस?

महाविकास आघाडी सरकारकडून (maha vikas aghadi government) शिवसेनेतर्फे उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार), राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), यशपाल भिंगे (साहित्य), आनंद शिंदे (कला), काँग्रेसकडून रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार), सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार), मुझफ्फर हुसेन (समाजसेवा), अनिरुद्ध वनकर (कला) ही नावं पाठवण्यात आल्याचं समजत आहे.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या आहेत. संविधानातील तरतूदींनुसार राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत, अशी अपेक्षा असते. परंतु काही अपवाद वगळता राजकीय पक्षांकडून बहुतांशी आपापल्या नेतेमंडळींचीच शिफारस या जागांसाठी करण्यात येते.

या निकषांच्या आधारे महाविकास आघाडीने १२ नावे निश्चित करून राज्यपालांना पाठवली आहेत. आता या नावांपैकी कुठल्या नावांची निवड राज्यपाल करतात आणि कुठली नावं फेटाळतात, हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा