Advertisement

अनिल परब यांची ‘ईडी’ला बगल, दिलं ‘हे’ कारण

पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने तसंच चौकशीचं कारण स्पष्ट नसल्याने कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचं अनिल परब यांनी ईडीला कळवलं आहे.

अनिल परब यांची ‘ईडी’ला बगल, दिलं ‘हे’ कारण
SHARES

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने नोटीस पाठवून चौकशीसाठी मंगळवार ३१ आॅगस्ट रोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने तसंच चौकशीचं कारण स्पष्ट नसल्याने कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचं अनिल परब यांनी ईडीला कळवलं आहे.

अनिल परब यांनी वकिलांच्या माध्यमातून ईडीला पत्र पाठवलं आहे. या पत्रात मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र मंत्रीपदाची जबाबदारी असल्याने या दिवशी माझे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे मी चौकशीला हजर राहू शकत नाही. म्हणून मला दोन आठवड्यानंतरची वेळ द्यावी. त्याचप्रमाणे नोटिशीत चौकशीचं कारण लिहिलेलं नसल्याने चौकशीचं कारण स्पष्ट करावं. कारण मला चौकशीत योग्य माहिती देता येईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपांच्या आधारे सीबीआय तसंच 'ईडी' कडून तपास सुरू आहे. या प्रकरणात मनी लाॅन्डरिंग झाल्याचा ईडीचा संशय आहे. त्यानुसार देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना 'ईडी'ने अटक केली आहे. या प्रकरणांतर्गत चौकशी करण्यासाठी परब यांना चौकशीसाठी 'ईडी'ने समन्स बजावला आहे.

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सीबीआयच्या कोठडीत असताना लिहिलेल्या पत्रात अनिल परब यांच्यावरही आरोप केले आहेत. तसंच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील बेकायदा बांधकाम प्रकरणात अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा