Advertisement

मराठी भाषेचा सरकारला पुन्हा कळवळा! मराठी भाषा भवनासाठी समिती स्थापण्याचा निर्णय

इतकी वर्षे रखडलेल्या मराठी भाषा भवनासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषा भवनाच्या स्थापनेसाठी जागेची शोधाशोध व निश्चिती या समितीमार्फत केली जाणार आहे. प्रत्यक्षात मराठी भाषा भवन कधी अस्तित्त्वात येईल हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.

मराठी भाषेचा सरकारला पुन्हा कळवळा! मराठी भाषा भवनासाठी समिती स्थापण्याचा निर्णय
SHARES

मराठी भाषा दिन जवळ आला की आपल्याला मराठीविषयी प्रेम असल्याचा खोटा आव आणण्याचा सरकारने पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. इतकी वर्षे रखडलेल्या मराठी भाषा भवनासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. मराठी भाषा भवनाच्या स्थापनेसाठी जागेची शोधाशोध व निश्चिती या समितीमार्फत केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मराठी भाषा भवन कधी अस्तित्त्वात येईल हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. तरीही आपल्याला मराठी भाषेचा किती कळवळा आहे हे सरकार पुन्हा एकदा दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे.


रंगभवनाची जागा रद्द

मराठी भाषा भवन मुंबईत उभारण्यासाठी सरकारला जागा मिळत नाही. यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दक्षिण मुंबईतील धोबी तलाव परिसरात रंगभवन येथे मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्राची (मराठी भाषा भवन) उभारणी करण्यात येणार होती. मात्र, रंगभवनची वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट असल्याने या जागेवर भाषा भवन उभारण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.


'इथं' घेणार शोध

चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, फोर्ट किंवा वांद्रे-कुर्ला वसाहत परिसरात भाषा भवनाची वास्तू उभारण्याबाबत मराठी भाषा विभागाच्या स्तरावर निर्णय घेण्याचं आज ठरविण्यात आलं. त्यामुळे आता मुंबई आणि नवी मुंबई या दोन ठिकाणी मराठी भाषा भवनासाठी जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.


ऐरोलीत उपकेंद्र

मुंबई येथे मराठी भाषा भवनाची मुख्य प्रशासकीय इमारत, तर नवी मुंबईत ऐरोलीत मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रम आणि इतर संशोधनात्मक कामांसाठी इमारत बांधली जाईल. भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ या सर्व विभागांनी एकत्र काम करावं, हा उद्देश मराठी भाषा भवन उभारण्यामागे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा