Advertisement

Maharashtra Bandh : मविआचा 24 ऑगस्टचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने आपला निर्णय मागे घेतला.

Maharashtra Bandh : मविआचा 24 ऑगस्टचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे
SHARES

24 ऑगस्टला होणारा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

मात्र, महाराष्ट्र बंदच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (23 ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं.

यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

“उच्च न्यायालयाने हा निर्णय ज्या तत्परतेने दिला त्याच तत्परतेने महाराष्ट्रात जे गुन्हे घडत आहेत. त्या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्याची तत्परता दाखवावी. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा लागतो. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र, त्यामध्ये काही अवधी लागू शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आता वेळ नाही. त्यामुळे आम्ही आता ठरवलं आहे की, उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. मात्र, महाराष्ट्रभर आम्ही महाविकास आघाडीची सर्व नेते आणि कार्यकर्ते हातामध्ये काळे झेंडे घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही घडलेल्या घटनांचा निषेध करणार आहोत”, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.



हेही वाचा

सुप्रिया सुळेंकडून आरोपींना फाशी देण्याची मागणी

एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव : संजय राऊत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा