एक 'बंगला' न्यारा

  Mumbai
  एक 'बंगला' न्यारा
  मुंबई  -  

  मुंबई - दोन वेळा राज्यमंत्री, चार टर्म्स लोकांमधून निवडून गेलेले प्रतिनिधी म्हणजे विधानसभेचे आमदार, सातेक वर्ष विधानपरिषद सदस्य आणि सध्या त्याच ज्येष्ठांच्या सभागृहाचे म्हणजेच विधान परिषदेचे उपसभापती. माणिकराव ठाकरे यांची महाराष्ट्रातल्या राजकारणाला ओळख नवी नाही. काही दशकं संवैधानिक पदांवर काम करण्याचा गाठीशी असलेला अनुभव माणिकरावांना मनाजोगी गृहप्राप्ती मात्र करुन देऊ शकलेला नाही. विधान परिषदेचे उप सभापती झाले खरे पण त्यांना एरवी उप सभापतींना दिला जाणारा बंगला मात्र अद्याप वितरीत करण्यात आला नाही. माणिकराव ठाकरे यांना नरिमन पॉइंट परिसरातल्या ‘सुनिती’ इमारतीत चार खोल्यांचा फ्लॅट देण्यात आला आहे. उप सभापती पदावरील व्यक्तीस वास्तव्यासाठी बंगला दिला जावा, असा ‘पारदर्शक’ राजकारणाचा संकेत सत्ताधारी भाजपाने धुडकावला आहे, असा माणिकराव ठाकरे यांच्या समर्थकांचा आरोप आहे. उप सभापती पदावर प्रदीर्घ काळ काम करणारे वसंत डावखरे यांचं वास्तव्य असलेला सी-3 हा बंगला विद्यमान उप सभापती माणिकराव ठाकरे यांच्याऐवजी सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री मदन येरावार यांना देण्यात आला आहे.

  माणिकराव ठाकरे आणि मदन येरावार यांच्यातलं यवतमाळच्या स्थानिक राजकारणावरुन असलेलं वैमनस्य सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेच्या उप सभापती म्हणून आपल्याला मिळू शकणारा बंगला आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला दिला गेल्यानं माणिकराव दुखावले गेल्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर बंगला आपल्याला वितरीत व्हावा, अशी विनंती करणारं पत्र खुद्ध माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. पण त्यांच्या विनंतीची दखल मुख्यमंत्र्यांनी अद्याप तरी घेतल्याचं दिसत नाही. विशेष म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनलेला सी-3 या बंगल्यात वास्तव्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ वसंत डावखरे यांना देण्यात आली होती. पण डावखरे यांना देण्यात आलेल्या मुदतवाढीचा काळ संपण्यापूर्वीच येरावार यांनी बंगल्यात स्वतःचं बस्तान बसवलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत डावखरे यांच्याकडून सदर बंगल्याचा ताबा सोडल्याचं पत्र मिळण्यापूर्वीच येरावार यांनी बंगल्यात पूजा करुन घेतली आणि वास्तव्याला सुरुवात केली. पण या मुद्द्याचं राज्यमंत्री मदन येरावार यांनी मात्र खंडन केलं आहे. “माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेचे उप सभापती म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वीच मी राज्यमंत्री झालो. सुरुवातीला माझ्यासाठी मलबार हिल परिसरात फ्लॅट वितरीत करण्यात आला होता. पण मी त्या फ्लॅटमध्ये राहण्याऐवजी आमदार निवासातल्या खोली क्रमांक 112 मध्ये राहण्याला प्राधान्य दिलं. मला सी-3 हा बंगला वितरीत झाल्यानंतर वसंत डावखरे यांनी त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती केली, हे खरे आहे. बंगला तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या ताब्यात असताना मी तिथे पूजा करुन वास्तव्यास जाणे कसे शक्य आहे? माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. पण इथे त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मुळात सी-3 हा बंगला फक्त विधान परिषद उपसभापतीलाच दिला जावा, असा कोणताही नियम नाही. त्यामुळे या बंगल्यात राहण्याचा नैतिक अधिकार माणिकराव ठाकरे यांनाच आहे, या दाव्यात काहीही अर्थ नाही.” या शब्दांत येरावार यांनी ‘मुंबई लाइव्ह’जवळ आपली बाजू मांडली. “माणिकराव ठाकरे यांचं मुंबईत घर आहे. माझ्यासारख्या मुंबईबाहेरुन आलेल्या, लोकांमधून निवडून आलेल्या आणि मंत्रीपद मिळवलेल्या व्यक्तीने बंगल्यात राहणं अयोग्य कसं?” असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.

  दरम्यान, माणिकराव ठाकरे यांची बंगल्यासाठीची प्रतिक्षा संपण्याची चिन्हं तूर्ततरी दिसत नाहीत. येरावार यांनी त्यांना मिळालेला बंगला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मनाजोगा बंगला मिळण्यासाठी फिल्डिंग लावलेली आहे, हे माणिकराव ठाकरे यांच्या अनुभवी नजरेनं हेरलं आहे. तरीही काँग्रेसप्रणित आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपा आमदारांच्या मतदारसंघातली कामं करुन देण्याची सय जागवत माणिकरावांना बंगला मिळवून देण्याचे मोजक्या काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरुच आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.