भाजपाच्या महापालिका गटनेतेपदी मनोज कोटक

  Mumbai
  भाजपाच्या महापालिका गटनेतेपदी मनोज कोटक
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी यशवंत जाधव यांची निवड करण्यात आल्यानंतर आता भाजपाच्या महापालिका गटनेतेपदी मनोज कोटक यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्यावतीने याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
  मुंबई महापालिकेत भाजपाने आपल्या नगरसेवकांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. अभासेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी भाजपा नगरसेवकांसह कोकण भवनमध्ये जावून त्यांच्यासोबत नोंदणी करत भाजपाला समर्थन दिले. अपक्ष नगरसेविका मुमताज रहेबर खान यांनी शिवसेनेसोबत कोकण आयुक्त कार्यालयात जावून अपक्ष म्हणून स्वतंत्र नोंदणी केली होती. परंतु शुक्रवारी त्यांनी भाजपासोबत जावून आपली नोंदणी केली आहे. त्यामुळे भाजपाची सदस्य संख्या वाढून 84 एवढी झाली आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपा हा दुसरा मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाकडून मराठी चेहरा देण्यासाठी शैलजा गिरकर यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान महापालिकेच्या गटनेतेपदी काँग्रेसनेही रवी राजा यांची नियुक्ती केल्याचे समजते.

  राष्ट्रवादी सोबत गेल्यास काय होईल?
  शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांनी आपली नोंदणी कोकण आयुक्त कार्यालयात जावून केलेली आहे. परंतु अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्यास भाजपाची सदस्य संख्या 93 वर पोहोचली जाणार आहे.

  नगरसेवक फुटल्यास…
  याशिवाय राष्ट्रवादी पक्षाचे 6 नगरसेवक आणि मनसेचे चार नगरसेवक फोडले तरीही स्वतंत्र गट स्थापन करत भाजपाला आपले संख्या बळ 94वर नेऊन स्वत:चा महापौर बसवणे सोपे आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
  मनसेला पाठिंबा दिल्यास…
  महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनेही आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेने उमेदवार दिल्यास भाजपाकडून मनसेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. मनसेचा महापौर देऊन उर्वरीत समित्या भाजपा स्वत:कडे ठेवेल. महापालिकेतून शिवसेनेचा झेंडा उतरवून मनसेला पुढे करत शिवसेनेचा मानसिक पराभव करण्याची संधीचा लाभ भाजपाकडून घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.