
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपाच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आंदोलनवेळी भाजपाने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत याबाबत मराठा क्रांती मोर्चाने नाराजी व्यक्त केली आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपवर बहिष्कार घालून भाजपविरोधात उमेदवार उभे करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा समाजावर अन्याय केल्याचं, यावेळी पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने आंदोलन केले होते. यातील आरक्षणाची मागणी सोडून अन्य मागण्यांची पूर्तता झालेली नाही.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा इशारा याआधी मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा -
मनसेच्या नितीन नांदगावकर यांना तडीपारची नोटीस
