Advertisement

दुकानांच्या पाट्या मराठीतच, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय घेण्यात आला आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीतच, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
SHARES

राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र दुकानं, आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते.

कामगार संख्या १० पेक्षा कमी असलेल्या आस्थापना, तसंच १० पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

मात्र, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल अशा आस्थापनेस महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावं देण्यात येऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मराठी पाट्यांसाठी केलेलं आंदोलन राज्यभरात गाजलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध शहरात मराठी दुकानांच्या पाट्या फोडल्या होत्या.

मनसेच्या आंदोलनानंतर अनेक शहरातील दुकानांवर मोठ्या अक्षरात मराठी पाट्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा उपस्थित होतोय. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.



हेही वाचा

विद्या चव्हाण यांना नोटीस, अमृता फडणवीसांना ‘डान्सिंग डॉल’ बोलणं भोवलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा