भाजपासारखी बोगस नोंदणी नको- राज ठाकरे


SHARE

मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरूवात करा, पण इतर राजकीय पक्षांसारखी बोगस नोंदणी करायची नाही. भाजप आणि मोदींसारखं वाटेल ते आकडे सांगायचे नाहीत, असे आकडे फेकायला काय आपण रतन खत्री आहोत का? अशा शेलक्या शब्दांत राज यांनी मोदी आणि भाजपाला टोला लागावला.


सदस्य नोंदणीला सुरूवात

मनसेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्याच्या सूचना करत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. मात्र त्याचवेळी हे आदेश देताना भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची संधी मात्र त्यांनी सोडली नाही.


निवडणुकीचे वेध

सर्वच राजकीय पक्षांना २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने सदस्य नोंदणीला वेग आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं सोमवारी दिसून आलं. मी स्वत: पक्ष नोंदणी केली आहे, तुम्हीही करा, ठिककिठाकणी पक्ष नोंदणीचं आवाहन करणारे फलक लावा, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.


तर, अधिकाऱ्यांना तुडवा

१८ मार्चला मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असतानाच राज ठाकरे यांनी या मेळाव्यातील भाषणाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. कारण या भाषणाच्या वेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वीज घालवली तर अधिकाऱ्यांना तुडवा , असं वादग्रस्त विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.

माझ्या भाषणाच्या वेळेस वीज घालवण्याचे धंदे केले जातात. राजकीय दबावाखाली असं केलं जातं. त्यामुळे १८ मार्चच्या आधीच मेणबत्त्या आणून घरात ठेवा आणि असा प्रकार झाला तर त्या अधिकाऱ्यांना हिसका दाखवण्याची गरज लागेल, असंही राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या