Advertisement

‘मनसे’कडून IPL च्या बसची तोडफोड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे.

‘मनसे’कडून IPL च्या बसची तोडफोड
SHARES

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १४ व्या पर्वाला येत्या २६ मार्चपासून सुरूवात होत आहे. सर्व खेळाडूंनी सामन्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र आयपीएलबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करणारी बस फोडली. मंगळवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी आयपीएलची एक बस फोडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या व्हॉल्वो बसची मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री तोडफोड केली. ताज हॉटेलबाहेर असणारी ही बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडली आहे. यावेळी त्यांनी बसवर ‘मनसेचा दणका’ असं पोस्टर चिकटवत तोडफोड केली.

आयपीएलचं आयोजन हे देशभरात केलं जातं. त्यामुळं आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंना संबंधित राज्यातील बस वाहतूक व्यवस्था पुरवतात. परंतू, मुंबईत खेळवल्या जाणाऱ्या सामन्यांसाठी व या करतीला येणाऱ्या सहभागी खेळाडूंना वाहतूक व्यवस्था देण्यासाठी महाराष्ट्राबाहेरून बसची सुविधा केली जात होती.  मात्र, ‘मुंबईत सामने आणि महाराष्ट्राबाहेरचे वाहतुकदार’ ही बाब मनसेच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चौकशीला सुरूवात केली. परंतू, अखेर ‘मनसे स्टाईल’नं मनसेच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे.  

आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ही तोडफोड करण्यात आली. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या प्रवासासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या आहेत. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नसल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम दिलं जावं अशी मनसेची मागणी आहे. मनसेचे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणी गेल्या आठवड्याभरापासून मी आयपीएशी संबंधित अधिकारी, राज्यातील मंत्री आणि संबंधित सर्व वाहतूक ठेकेदरांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देत, फेसबुकवरुन विनंती केली. आयपीएलच्या आयोजनाची बैठक झाली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी आयपीएलमुळे अर्थचक्र वाढेल, हॉटेल उद्योग तसंच वाहतूक क्षेत्र वाढेल असं कबूल केलं होतं. पण दुर्दैवाने आयपीएलचं सर्व काम दिल्लीमधील कंपन्यांना दिलं गेलं. महाराष्ट्रात तेवढे सक्षम वाहतूकदार आहेत. टेम्पोदेखील दिल्लीतून आणले जात असून ऐकत नसल्याने मनसेने इशारा दिला होता. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे”.

“दिल्लीच्या गाड्यांवर कोणताही करत नाही. त्यांना कोणताही कर भरावा लागत नसल्याने ते कमी टेंडर भरत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत आहे. आधीच लॉकडाउनमुळे पिचले असताना उद्योगधंदा नाही. पण तरीही मुद्दामून केलं असं म्हणणं योग्य नाही,” असंही ते म्हणाले.

‘आयपीएल’च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा