महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी महाअधिवेशन

मनसेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरे मुंबईत अनावरण करणार आहेत.

SHARE

मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर गुरूवारी मनसेचं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमीका मांडणार? याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्याशिवाय, मनसेच्या या राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या निमित्तानं राज ठाकरेंचे पुत्र अमित  ठाकरे यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार का हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

गोरेगाव इथं होणाऱ्या मनसेच्या महामेळाव्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार आहेत. मराठीच्या मुद्द्यासोबतच ते भाजपला सोयीची अशी हिंदुत्वाची भूमिका घेतील का? पक्षाचा झेंडा भगवा होईल का? याविषयी सध्या राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

गुरूवारी सकाळी ९ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दीपप्रज्वलन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाअधिवेशनाचं उद्घाटन करणार आहेत. या महाअधिवेशनात विविध मुद्द्यांवर ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणं राज ठाकरे नव्या झेंड्याचं अनावरण करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांच भाषण होणार आहे.

मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनासाठी गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडवर मध्यरात्रीपासूनच महाराष्ट्रभरातून मनसेचे कार्यकर्ते दाखल होत आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, जळगाव, पिंपळगाव, नाशिक इथूनही मोठ्या प्रमाणात कायकर्ते मुंबईत येत आहेत. राज ठाकरे काय बोलणार? आणि मनसेचा नवीन ध्वज प्रत्यक्ष बघण्याची उत्सुकता त्यांना लागली आहे.

डोंबिवली हा मनसेचा बालेकिल्ला समजला जात असून, मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी डोंबिवलीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात रवाना झाले आहेत. डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतून कार्यकर्त्यांच्या बसेस रवाना झाल्या आहेत. डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील निवडून आले आहेत.

मनसेच्या महाअधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. या अधिवेशनात १० हजार लोकांचं जेवण तयार होत आहे. नाश्त्यासाठी उपमा आणि चहा तर जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि गोड पदार्थ असा जेवणाचा बेत असणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या