Advertisement

वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरे सरकारला महाराष्ट्र बंदवरून सणसणीत टोला लगावला आहे.

वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला
SHARES

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं एका वेगवान कारनं शेतकऱ्यांना चिरडण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदवरून सत्ताधारी शिवसेनेला विरोधी पक्ष मनसेनं चांगलाच टोला हाणला आहे. मनसेनं देखील "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरे सरकारला महाराष्ट्र बंदवरून सणसणीत टोला लगावला आहे. "मुंबईचे अनभिषिक्त 'बंदसम्राट'- कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या नंतरचे खरे राजकीय 'बंदसम्राट' म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच. त्या काळी शिवसेनेच्या वाघानं एक डरकाळी फोडली की, कडकडीत बंद पाळला जायचा. आताच्या शिवसेना कार्यप्रमुखांना- स्वतः मुख्यमंत्री असूनही- पोलिसांच्या गराड्यात दुकानदारांना 'बंद करा' 'बंद करा' असं सांगत 'म्याव म्याव' आवाहन करावं लागतं! वाघनखं गमावलेल्या पक्षाचा 'राज्य सरकार पुरस्कृत' बंद मुंबई- महाराष्ट्रात अयशस्वी ठरला यात आश्चर्य नाही. काय वाटलं असेल आज वंदनीय बाळासाहेबांना?" असं म्हणत जोरदार टीका केली आहे.


महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. याच दरम्यान अनेकांनी या बंदवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

लोकसभेत शेतकरी विरोधातील विधेयक पास होतं तेव्हा महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून गप्प का बसले होते? राज्यसभेत शरद पवार अनुपस्थित का होते? या सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतील. उत्तर प्रदेशातील घटना निषेधार्थ आहेत. लॉकडाऊनमुळं राज्यातील जनता त्रस्त आहे. निषेध करायचा असेल तर एक दिवसाचं अधिवेशन बोलवा. घटनेच्याविरोधात ठराव करा. चर्चा करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार. पंतप्रधान मोदींशी बोलणार. तुमचे संबंध चांगले आहेत असं बोलणार मग तुमच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरणार हे कसलं राजकारण? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकारला केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा