Advertisement

हिंमत असेल तर अटक करून दाखवाच! मनसेचं सरकारला थेट आव्हान

आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी सरकारला आव्हान दिलं आहे.

हिंमत असेल तर अटक करून दाखवाच! मनसेचं सरकारला थेट आव्हान
SHARES

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यास प्रशासनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारली आहे. तरीही नियोजित कार्यक्रम करणार म्हणजे करणारच, अशी ठाम भूमिका घेणारे मनसे नेते अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे मनसे (mns) आक्रमक झाली असून हिंमत असेल तर अमेय खोपकर यांना अटक करून दाखवाच, असं आव्हानच मनसेने दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मनसेच्या प्रत्येक शाखेत स्वाक्षरी मोहीम कार्यक्रम राबवण्याच्या सूचना मनसैनिकांना दिल्या आहेत. तर दादर शिवाजी पार्कमध्येही मनसेकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत होतं. मात्र या आयोजनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून कार्यक्रमाचे आयोजक अमेय खोपकर यांना नोटीस देखील बजावली आहे.

हेही वाचा- “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...” राज ठाकरेंचं मराठी माणसाला पत्र

त्यावर अमेय खोपकर यांनी आपल्या शब्दांत संताप व्यक्त केला आहे. कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे. त्या नियमांचं काटेकोर पालन करून मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला.

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत, अशा संजय राठोडसारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात ‘मराठी भाषा दिवस’ का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही. यावर शिक्कामोर्तबच झालंय. पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच अमराठी आहे की काय?  

आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी सरकारला आव्हान दिलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अमेय खोपकर यांना अटक करून दाखवाच, असं आव्हान देखील दिलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा