Advertisement

“आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...” राज ठाकरेंचं मराठी माणसाला पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला पत्र लिहून मराठी भाषेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही, तर एक माेहीम हाती घेऊन त्यात सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं आहे.

“आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...” राज ठाकरेंचं मराठी माणसाला पत्र
SHARES

दरवर्षीप्रमाणे २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या मराठी भाषा दिनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाला पत्र लिहून मराठी भाषेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही, तर एक माेहीम हाती घेऊन त्यात सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे ३५८ दिवस ह्या सगळ्याचा विसर पडेल. मुळात मराठीचं काय होणार ह्या पेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल ह्याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणं हे जास्त महत्वाचं आहे.

आपली मराठी भाषा ही इतकी लेचीपेची अजिबात नाही की जिच्यासाठी आसवं गाळत बसावी. ही भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे ह्याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली ही भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते समर्थ रामदासस्वामींच्या मुखी असलेली ही भाषा, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हीच मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण हीच मातृभाषा.

हेही वाचा- हे सरकार अमराठी आहे काय?, मराठी भाषा दिन कार्यक्रम करण्यावरून मनसे आक्रमक 

लता दीदींच्या आणि आशा ताईंच्या गोड गळ्यातून पहिले शब्द जे निघाले ते ह्याच भाषेतले आणि १८४३ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीला देखील दखल घ्यायला लावली ती देखील मराठी रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारं कार्य करणारी ८ भारतरत्नही ह्या भूमीतीलच.

ह्या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला, ह्या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला, ह्या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला विचार दिला अशा भाषेचं काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून, इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत आणि ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो, तरी पुरेसं आहे.

मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरु करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांमध्ये फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

(mns chief raj thackeray wrote a letter for marathi bhasha din)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा