Advertisement

'आयपीएल'ची काॅमेंटरी मराठीत हवी, मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा

आयपीएलचं समालोचन मराठीतून करण्यासाठी मनसेनं डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे इशारा दिला आहे.

'आयपीएल'ची काॅमेंटरी मराठीत हवी, मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा
SHARES

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या दुबईत आयोजन करण्यात आलं आहे. आयपीएलचं हे १३वं पर्व असून, या पर्वातील दुसरा टप्पा सुरू झाल आहे. त्याशिवाय अंतिम सामना जवळ येत असल्यानं प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान यंदाच्या आयपीएलचं समालोचन हे हिंदी आणि इंग्रजीतून केलं जात असून, मराठीतून अद्याप सुरू केलेलं नाही. त्यामुळं आयपीएलचं समालोचन मराठीतून करण्यासाठी मनसेनं डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्राद्वारे इशारा दिला आहे.

'आयपीएल संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या, नाहीतर खळ्ळखट्याक पद्धतीनं आंदोलन करु, या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल', असा इशारा मनेसेनं दिला आहे. मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईक यांनी ट्विटवरवर याबाबत माहिती दिली असून, सोबतच पत्राचा फोटोदेखील शेअर केला आहे. 'आयपीएल क्रिकेट सामान्यांचं समालोचन मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करु, पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असुद्या', असाही इशारा मनसेचे केतन नाईक यांनी दिला.

'डिस्ने हॉटस्टार या ओ.टी.टी. व्यासपीठावर आयपीएलचे टी-२० सामने दाखविण्यात येत आहेत. हे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना खेळाचं समालोचन त्यांच्या पसंतीच्या भाषेत ऐकण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कनडा आणि बंगाली भाषा निवडण्याचा पर्याय आहे. पण महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही', असं मनेसेनं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

'डिस्ने हॉटस्टारचं मुख्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आहे. विशेष म्हणजे आयपीएलचे टी-20 सामने पाहणारा मराठी भाषिक प्रेक्षकवर्ग जास्त असताना आपल्याला मराठी भाषेचा विसर पडला. मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला गेला', असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा