Advertisement

पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांची मनसेला सोडचिठ्ठी

सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत सक्रीय असणाऱ्या पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील यांची मनसेला सोडचिठ्ठी
SHARES

येत्या निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे दौरे करत आहे. राज ठाकरे यांचा बुधवारी पुणे दौरा असून, या पुणे दौऱ्यापुर्वी मनसे पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत सक्रीय असणाऱ्या पुण्यातील मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

रुपाली पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी राज ठाकरे यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात त्यांनी दिलेल्या बळ आणि प्रेरणेसाठी आभार मानले आहेत. तसंच राज ठाकरे हे नाव कायम ह्रदयात कोरलेलं राहिल, असंही म्हटलं. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मी राजीनामा देताना वरिष्ठांना सांगितले की आहे की राज ठाकरे माझे दैवत होते आणि राहतील. पण मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर मी पुढे काय भूमिका घेणार आहे लवकर जाहीर करेल. मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझी भेट झाली. त्यानंतर वरुण देसाई यांच्यासोबतही माझी भेट झाली. ती सदिच्छा भेट होती. त्यानंतर मी राजीनामा दिला आहे,” असं रुपाली पाटील यांनी म्हटलं.

“मी संघर्ष करणारी आणि सर्वसामान्यांवर प्रेम करणारी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. मनसेमध्ये मी राज ठाकरेंकडे बघून राजकारणात आले. मी राज ठाकरेंना आणि कार्यकर्त्यांना माझ्या स्वार्थासाठी कधीही वाईट बोलणार नाही. पण माझी मते आणि मनातील खदखद वरिष्ठांच्या चौकटीत राहून राज ठाकरेंकडे व्यक्त केली आहे. मनसेमध्ये प्रचंड निस्वार्थी कार्यकर्ते आहेत. मी कुठे तरी जायचे आहे म्हणून मनसेला बदनाम करेल अशी मी स्वार्थी नाही. पण मी माझ्या कारणांमुळं राजीनामा दिला आहे,” असंही रुपाली पाटील यांनी म्हटलं.

“मला त्या गोष्टी परत परत बोलून वातावरण दूषित नाही करायचे. कारण त्यामुळंच मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कोणामध्ये बदल घडत नसेल तर मला तरी स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल,” अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.

“मनसेमध्ये काय बदल व्हायला हवेत हे राज ठाकरे सांगू शकतात. कारण राज ठाकरेंना सल्ला देण्याइतकी कार्यकर्ता म्हणून पात्रता नाही. त्यामुळं वैयक्तिकरित्या हा निर्णय घेतला आहे. मनधरणी सगळेच करतात. १४ वर्षे काम करत असताना संघर्ष कसा करायचा या पक्षातून मी शिकले आहे. कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप ठरवलेले नाही. लवकच निर्णय मी जाहीर करेल,” असंही रुपाली पाटील यांनी म्हटलं.

“संदिप देशपांडेंना मी आता उत्तर देणे म्हणजे त्यांना आणखीन दुखः होईल. मी त्यांना योग्य वेळी उत्तर देईन कारण मी त्यांची बहिण आहे. त्यांना वाईट वाटले असेल. एक भाऊ म्हणून ते व्यक्त झाले असतील पण मी त्यांना आता काही बोलू इच्छित नाही. योग्य वेळ आल्यावर मी सर्वांना उत्तर देईल,” असे रुपाली पाटील यांनी म्हटले. ज्या पद्धतीने मी करत होते त्यापद्धतीने मला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने स्विकारले तरच मी जाणार आहे. सध्या दोन पर्याय आहे तिसरा पर्याय आला तर सांगेन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा