नियमांचं उल्लंघन केल्याचं कारण देत ट्विटर इंडियाने चक्क काँग्रेस पक्षाचं ट्विटर हँडल लाॅक केलं आहे. यामुळे काँग्रेस पक्षाकडून मोदी सरकारवर तिखट शब्दांत हल्ला चढवण्यात येत आहे. ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
गुरूवारी सकाळी ट्विटर इंडियाने काँग्रेसचं ट्विटर हँडल लाॅक केल्यानंतर एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी पक्षाचं ट्विटर हँडल लॉक करण्यात आल्याची माहिती एएनआयशी बोलताना दिली. याआधी गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल लॉक केलं होतं. गुरुवारी सकाळी ट्विटरनं काँग्रेसच्या अजून काही नेतेमंडळींचे ट्विटर हँडल लॉक केल्यानंतर थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य ट्विटर हँडल लॉक केलं.
हेही वाचा- ओबीसींचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार- उद्धव ठाकरे
Congress says Twitter has blocked its account for violation of rules
— ANI (@ANI) August 12, 2021
Twitter acting under govt pressure. It has already blocked 5000 accounts of our leaders&workers across India. They need to understand we can't be pressurised by Twitter or govt:Rohan Gupta,Social Media Head,AICC pic.twitter.com/pP8fgqwroO
दिल्ली छावणीतील स्मशानभूमीत कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या ९ वर्षांच्या दलित मुलीच्या आई-वडिलांचे छायाचित्र शेअर केल्यामुळे राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल लॉक करण्यात आलं होतं. हे आमच्या धोरणाविरूद्ध असल्याने आम्ही राहुल गांधी यांचं ट्विट डिलिट केल्याची माहिती ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला दिली होती.
त्यावर प्रतिक्रिया देताना, केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विटर इंडिया हे काम करत आहे. ट्विटरने आत्तापर्यंत देशभरातील ५ हजारहून जास्त काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक केली आहे. जर पीडितेचा फोटो ट्विटरवर ठेवणं हे पॉलिसीचं उल्लंघन आहे, तर मग अनुसूचित जाती आयोगाच्या ट्विटर हँडलवर २ ऑगस्टपासून ५ ऑगस्टपर्यंत पीडितेचा फोटो का होता? असा प्रश्न रोहन गुप्ता यांनी उपस्थित केला आहे.
मोदीजी, तुम्ही किती घाबरता? काँग्रेस पक्षानं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. फक्त सत्य, अहिंसा आणि लोकांच्या इच्छेच्या जोरावर हे झालं. आम्ही तेव्हाही जिंकलो होतो, आम्ही पुन्हा जिंकू, असं काँग्रेसने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.