Advertisement

मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्याच कशा?, प्रविण दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मंत्रालयात आढळून आलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्याच कशा?, प्रविण दरेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
SHARES

मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? आघाडी सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे? असे प्रश्न उपस्थित करत मंत्रालयात आढळून आलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आढळून आल्याचं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिल्यानंतर एकच खळबळ माजली. तपासीणी केल्याशिवाय, पासशिवाय मंत्रालयात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. अशा कडेकोड सुरक्षा व्यवस्था असलेल्या मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. या बाटल्या नेमक्या आत नेल्या कुणी आणि रिचवल्या कुणी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

हेही वाचा- ‘ते’ फक्त बोलण्यासाठीच मंत्री झालेत, नवाब मलिकांचा दानवेंना टोला

यासंदर्भात प्रविण दरेकर यांनी देखील एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. या पत्रात ते म्हणतात की, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले प्रश्न घेऊन सामान्य जनता मंत्रालयात येऊ इच्छित असते. मात्र त्यांना प्रवेश पत्र मिळवण्यासाठी तासंतास रांगेत उभं राहावं लागतं. त्यांच्याकडे ओळखपत्र मागितलं जातं. त्यांच्या कामाचं स्वरूप समजावून घेतलं जातं. त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. त्यांच्या बॅगेत सुई किंवा त्यासदृष्य वस्तू असल्यास ती काढली जाते. सर्वसामान्यांच्या बाबतीत एवढी खबरदारी घेतली जात असताना मंत्रालयातील उपहारगृहाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच सापडतो हा प्रकार धक्कादायक आहे.

मंत्रालयात कडक सुरक्षा असताना एवढ्या मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या मंत्रालयात पोहोचल्या कशा?, त्या कोठुन आणण्यात आल्या, कोणी आणल्या तसंच मंत्रालयात मद्य प्राशन कुणी केलं, त्यात कोण कोण सामील होतं? या सर्व बाबींची अत्यंत गांभीर्याने चौकशी होण्याची आवश्यकता आहे. 

त्यामुळे अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या नेतृत्वात गृह, सामान्य प्रशासन विभाग आणि इतर संबंधित विभाग प्रमुखांच्या समितीमार्फत या गंभीर प्रकरणाची १५ दिवसांच्या आत चौकशी करावी, संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी व दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. समितीचा अहवाल, संबंधितांवर करण्यात आलेली कारवाई याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्रातील जनतेसाठी खुली करावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा- लोकल प्रवाशांचे ‘क्यू आर कोड’ तपासायचे कुणी?, रावसाहेब दानवेंनी जबाबदारी राज्याकडे ढकलली


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा